नगरसेवक नसल्याने मुंबईकर हैराण! समस्या अनेक मात्र करणार काय?
प्रशासकांमुळे माजी नगरसेवक आपल्या प्रभागांतील कामांसाठी थेट निधी मागू शकत नाहीत आणि त्यांना तसा निधीदेखील मिळत नाही. त्यामुळे विभागातल्या पाणी, गटार, अशा समस्यांसाठी सर्वसामान्य नागरिक वैतागले आहेत.
मुंबई : मुंबई महापालिकेचा कालावधी संपून एक वर्षांचा कालावधी उलटला आहे. परंतु, अद्याप नवीन नगरसेवकच नसल्याने मुंबईतल्या अनेक भागात समस्याच समस्या सध्या आहेत अन् त्यामुळे मुंबईकर हैराण झालेले आहेत. देशातील सर्वात मोठी महानगरपालिका म्हणजे मुंबई... याच मुंबई महापालिकेचा कालावधी संपून दीड वर्षांचा कालावधी उलटला आहे. परंतु, अद्याप या महापालिकांच्या निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत. यामुळे मुंबईत 227 माजी नगरसेवक आणि त्यांच्या विभागातील जनता ही अनेक समस्यानी हैराण आहेत .
मुंबई महापालिकेचा कालावधी संपल्याने 2022 मार्चला प्रशासनाचा कारभार पाहण्यासाठी प्रशासकाची नेमणूक करण्यात आली. प्रशासक नेमल्यानंतर प्रभागांतील कामे थांबलीत असे नाही. मात्र त्यावर बऱ्याच अंशी मर्यादा आहेत . प्रशासकांमुळे माजी नगरसेवक आपल्या प्रभागांतील कामांसाठी थेट निधी मागू शकत नाहीत आणि त्यांना तसा निधीदेखील मिळत नाही. त्यामुळे विभागातल्या पाणी, गटार, अशा समस्यांसाठी सर्वसामान्य नागरिक वैतागले आहेत.
नगरसेवक नसल्याने मुंबईत काय समस्या आणि अडचणी आहेत?
-पाणी वेळेवर येत नाही व पाणी अशुद्ध येते
-पिण्याच्या पाण्याची नवीन पाइपलाइनची समस्या
-नालेसफाई
-पालिका उद्यानात खुर्च्या नाहीत
- व्यायामाची साधने नाहीत
-तातडीने रस्ते दुरुस्ती होत नाहीय
-उद्याने- बागांचा विकास रखडलाय
-गटारांची सफाई नाही व झाकणे बसवली जात नाहीत
-रस्त्यात टाकलेला मातीचा ढिगारे पडले आहेत
-मूलभूत सोयी सुविधा असणारे प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न होत नाहीत
- झाडांची पडझड वाढलीय
- ड्रेनेज लाइन तुंबले आहेत
-रस्त्यावर सांडपाणी
बंद पथदिवे
-सार्वजनिक स्वच्छतागृह यासह रस्त्यावर पडलेले खड्डे दुरूस्ती
मुंबई महापालिकेत एकूण 227 प्रभाग आहेत. या सर्व प्रभागातील नगरसेवकांची मुदत 2022 मार्च रोजी संपलेली आहे. प्रशासक असल्याने समस्या घेऊन माजी नगरसेवक हक्काने जाऊ शकत नाहीत, गेले तरी निधी मिळत नाही. तसेच अनेक उपाययोजना करण्यासाठी स्थायी समिती व विविध समित्या देखील नसल्याने कोणत्याही प्रकल्पासाठी किंवा निधीसाठी देखील प्रयत्न करता येत नाही त्यामुळे विभागातले लोक मदत मागण्यासाठी येतात मात्र लोकप्रतिनिधी दोन्ही बाजूने कात्रीत अडकलेले आहेत.
मुंबई महापालिकेत नगरसेवक नसल्याने मुंबईकर हैराण झाले आहेत. त्याच प्रकारे मुंबई आणि लगतच्या परिसरातील महापालिकांची देखील हीच परिस्थिती आहे. मुंबई महापालिकेप्रमाणेच कोणत्या महापालिकांचा कालावधी संपलेला आहे आणि कुठे समस्या आहेत पाहुयात
महानगरपालिका - नगरसेवकसंख्या - संपलेला कालावधी
- मुंबई महापालिका - 227 - मार्च 2022
- ठाणे महापालिका -132 - मार्च 2022
- नवी मुंबई महापालिका - 111 - मे 2020
- कल्याण-डोंबिवली महापालिका - 122 - नोव्हेंबर 2020
- पनवेल महापालिका - 78 - जुलै 2022
- मिरा-भाईंदर महापालिका - 95- ऑगस्ट 2022
- वसई-विरार महापालिका - 102 - जून 2020
- उल्हासनगर महापालिका - 78 - एप्रिल 2022
- भिवंडी-निजामपूर महापालिका - 90 - जून 2022
मुंबई महापालिकेत मार्फत गेल्या वर्षभरात प्रकल्पांवर पैसे खर्च झाल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येतं मात्र 227 प्रभागात विकासकामांसाठी तेवढ्या प्रमाणात निधी खर्च होत नसल्याने अनेक मूलभूत समस्याही कायम आहेत . त्यामुळे मुंबईकरांच्या या समस्या सोडवायच्या असतील तर पुढील काळात लवकर महापालिका निवडणुका लागायला हव्यात तरच यावर तोडगा निघू शकतो. त्यामुळे आता आगामी काळात मुंबई महापालिका आणि या इतर निवडणुका कधी लागतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.