Mumbai Water Supply : मुंबईकरांना आज पाणीबाणीचा सामना करावा लागणार आहे. कारण मुंबई शहर, पूर्व उपनगरामधील अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पिसे येथील उदंचन केंद्रात संयंत्राला आग लागल्याने जलाशयांमधून होणारा पाणीपुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे मुंबई शहर आणि पूर्व उपनगरामधील अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा बाधित होणार आहे. तसेच, काही भागांत 100 टक्के तर काही भागांत 30 टक्के पाणीपुरवठा बंद राहणार आहे. 


बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार,  पिसे येथील जल उदंचन केंद्रात संयंत्राला आग लागण्याची घटना (दिनांक 26 फेब्रुवारी 2024) सोमवारी समोर आली. या घटनेमुळे मुंबई पूर्व उपनगरांमधील पूर्वेचा भाग, ट्रॉम्बे निम्नस्तरिय जलाशय, ट्रॉम्बे उच्चस्तरिय जलाशय, घाटकोपर निम्नस्तरिय जलाशय तसेच शहर विभागातील एफ दक्षिण, एफ उत्तर विभाग, गोलंजी, फोसबेरी, रावळी तसेच भंडारवाडा जलाशयांमधून होणारा पाणीपुरवठा आज मध्यरात्रीपासून पुढील सूचना मिळेपर्यंत बंद राहणार आहे. तसेच ठाणे शहर, भिवंडी व नगर बाह्य विभाग येथील मुंबई 2 व 3 जलवाहिन्यातून होणारा पाणीपुरवठा बंद राहील. तसेच उर्वरित शहर विभाग, पूर्व उपनगरे व पश्चिम उपनगरांमधील पाणीपुरवठा 30  टक्क्यांनी कपात करण्यात येत आहे.  


100 टक्के पाणीपुरवठा बंद असलेला भाग



  • टी विभाग (पूर्व आणि पश्चिम), एस विभाग (नाहूर पूर्व, भांडुप पूर्व, विक्रोळी पूर्व), एन विभाग (विक्रोळी पूर्व, घाटकोपर पूर्व, सर्वोदय नगर, नारायण नगर), एम पूर्व व एम पश्चिम संपूर्ण विभाग, एफ दक्षिण व एफ उत्तर संपूर्ण विभाग, भंडारवाडा जलाशयातून पाणीपुरवठा होणारा ई, बी आणि ए विभाग.


30 टक्के पाणीपुरवठा बंद असलेला भाग



  • वर उल्लेख केलेल्या विभागाव्यतिरिक्त उर्वरित महानगरपालिकेतील विभाग, पश्चिम उपनगर, पूर्व उपनगर आणि शहर विभाग.


मुंबईकरांनो पाणी जपून वापरा...


पिसे येथील उदंचन केंद्रात संयंत्राला आग लागल्याने जलाशयांमधून होणारा पाणीपुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे मुंबई शहर आणि पूर्व उपनगरामधील अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा बाधित होणार नसल्याची माहिती महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आली आहे. विशेष म्हणजे काही भागांत 100 टक्के तर काही भागांत 30 टक्के पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी आणखी किती वेळ लागेल याबाबत कोणतेही माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे मुंबईकरांनी पाणी जपून वापरण्याची गरज आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


गिरगावच्या श्याम सदन गणेशोत्सव मंडळाकडून सर जेजे धर्मशाळेतील ज्येष्ठ नागरिकांसाठी आपुलकीचा हात