मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातलेल्या आणि बुडीत गेलेल्या येस बँकेत 140 कोटींच्या ठेवी असल्याची बाब आज विद्यापीठाच्या सिनेट बैठकीत उघडकीस आली. याबाबत मुंबई विद्यापीठाच्या सिनेट सदस्य सुप्रिया करंडे यांनी हा मुद्दा उपस्थित केला. हा मुद्दा अचानक समोर आणल्याने याबाबत कुलगुरु सुहास पेडणेकर यांनी चौकशी समितीची स्थापना करून याची माहिती घेण्याचे आश्वासन दिले मात्र त्यावर समाधान न झाल्याने सदस्यांनी सभा तहकूब केली.


महाविद्यालयांना नॅशनल शेड्यूल्ड बँकेत खाते नसेल तर त्यांची संलग्नता रद्द करण्यात येते असे असताना विद्यापीठाने खासगी बँकेत कसे पैसे ठेवले? असा प्रश्न सिनेट सदस्यांकडून उपस्थित करण्यात आला. विद्यापीठाच्या बजेटमध्ये ठेवींबाबत कोणतीही माहिती सदस्यांना देण्यात येत नाही. हा एक घोटाळा असून यासंदर्भात पोलीस तक्रार करण्याची सदस्यांनी मागणी केली आहे.

ऑगस्ट 2018 च्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मंजूरी मिळाल्यानंतरच मागील महिन्यात 4 बँकांकडून कोटेशन्स मागविण्यात आले आणि सगळ्यात जास्त व्याजदर देणाऱ्या बँकेत ठेवी ठेवण्याचा निर्णय झाल्याची माहिती प्रकुलगुरू रवींद्र कुलकर्णी यांनी दिली. सिनेट सदस्यांनी घाबरून न जाता विद्यार्थ्यांचे पैसे सुरक्षित आहेत. निर्णय घेतल्यास आत्ताही हे फिक्स्ड डिपॉझिट मोडता येईल अशी माहितीही ही त्यांनी दिली. विद्यार्थ्यांच्या ठेवी येस बँकेसोबत इतर आणखी 9 बँकांमध्ये सुरक्षित असल्याची माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली आहे.

तर याबाबत मुंबई विद्यापीठान निवेदन जाहीर करून या सगळ्या व्यवहाराबद्दल माहिती दिली आहे. या व्यवहारबद्दल महाराष्ट्र शासन वित्त विभाग यांच्या दिनांक 27 ऑक्टोबर 2015 रोजी निर्गमित झालेल्या, राज्यातील सार्वजनिक उपक्रमांनी त्यांच्याकडील शिल्लक असलेला अखर्चित निधी गुंतवणूकी संदर्भातील शासन निर्णयातील मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने मुंबई विद्यापीठाकडे असलेल्या अखर्चित निधीच्या गुंतवणूकीसाठी 23 ऑगस्ट 2018 च्या वित्त व लेखा समितीच्या बैठकीत या शासन निर्णयाच्या अनुषंगाने ठराव करण्यात आला होता.

येस बँकेच्या दिवाळखोरीचा औरंगाबाद महापालिकेला फटका, बस वाहतुकीचे 9 कोटी बँकेत अडकले


या समितीने केलेल्या ठरावाच्या अनुषंगाने 10 सप्टेंबर 2018 रोजीच्या व्यवस्थापन परिषदेमध्ये या ठरावास मान्यता देण्यात आली. या ठरावाच्या अनुषंगाने ज्या बँकेंची किमान 4000 कोटी नक्त मत्ता (Net Worth) असेल अशा बँकेत गुंतवणूक करावी असे ठरले होते. त्यानुसार वित्त व लेखा विभागामार्फत कार्यवाही केली गेली. विविध बँकेत निधी गुंतविण्यासाठी वित्त व लेखा विभागामार्फत कार्यवाही करताना बँकेकडून ऑनलाईन निविदा मागविल्या जातात व त्या दिवशी ज्या बँकांचे व्याजदर सर्वाधिक असतील अशा बँकेत गुंतवणूक यामध्ये केली जात असल्याचा विद्यापीठकडून सांगण्यात आलं.

यामध्ये विशेष बाब म्हणजे एकाच बँकेत अधिकाधिक ठेवी न ठेवता विविध बँकेत ठेवी ठेवल्या जातात. या ठेवींचे 31 मार्चला संविधानिक लेखा परीक्षकाकडून लेखा परीक्षण केले जाते. यानुसार मुंबई विद्यापीठाने 2019 ला विविध 12 बँकांमध्ये आणि 2020 ला विविध 9 बँकांमध्ये ठेवी ठेवल्या आहेत. या 9 बँकेमध्ये येस बँकेचा समावेश असून या बँकेत ठेवी ठेवताना त्या दिवशीचा गुंतवणूकीचा व्याजदर हा सर्वाधिक 8.05 टक्के एवढा असल्याने या बँकेत विद्यापीठाने रुपये 140 कोटीच्या ठेवी ठेवल्या आहेत.

Yes Bank | येस बँकेच्या राणा कपूर यांच्या ईडी कोठडीत वाढ, 16 मार्चपर्यंत कोठडीत मुक्काम


त्यामुळे या व्यवहारानंतर विद्यापीठाचे वित्तीय धोरण, गुंतवणूक, विनियोग याबाबत विद्यापीठास मार्गदर्शन आणि सल्ला मिळावा व तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून पारदर्शकता आणण्यासाठी विद्यापीठाने समितीचे गठण केले आहे. या समितीच्या मार्गदर्शनखाली पुढचा व्यवहार, गुंतवणूक केली जाणार आहे.