मुंबई : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करावी. तसेच इतर कॉर्पोरेट आणि खासगी कंपन्यांनीही कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची मुभा द्यावी. अशी मागणी करत सागर शिवाजीराव जोंधळे या डोंबिवलीतील विधी शाखेच्या संचालकांनी मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल केली आहे. शुक्रवारी हायकोर्टाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती नितीन बोरकर यांच्या खंडपीठापुढे ही याचिका सादर झाली असता हायकोर्टानं यावर सोमवारी तातडीची सुनावणी घेण्याचं निश्चित केलं आहे.


राज्य सरकारनं कोरोनाचा प्रसार वाढू नये यासाठी योग्य ती खबरदारी घेत ठोस उपाययोजना तातडीनं सुरू कराव्यात. एकाच ठिकाणी शेकडो किंना हजारोंच्या संख्येत लोकं जमा होणार नाहीत याची काळजी घ्यावी. त्याचबरोबर परदेशांतून येणाऱ्या प्रवाश्यांची विमानतळांवर कसून तपासणी करण्यासाठी तिथं अद्ययावत उपकरणं आणि प्रशिक्षित डॉक्टर्स तैनात करावेत जेणेकरून या रोगाचा प्रादुर्भाव वाढणार नाही. त्याचबरोबर राज्यभरातील न्यायालयं, लवाद, प्राधिकरणं इथं सुरू असलेले अत्यावश्यक खटले वगळता इतर खटलेही तूर्तास स्थगित करावेत जेणेकरून तिथं लोकांचा वावर कमी होईल अशीही मागणी केली आहे.

Coronavirus | 'मला कोरोना झालेला नाही, मी ठणठणीत', कोरोना झाल्याच्या अफवेवर नागपूर जिल्हाधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण

त्याचबरोबर त्वचाविकार कायदा 1897 मधील तरतूदींनुसार संबंधित मंडळानं या भयंकर रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यास सुरूवात करावी. त्यासाठी मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारसह सर्व स्थानिक प्रशासनांना आदेश जारी करावेत अशी मागणीही या याचिकेतून करण्यात आली आहे. या याचिकेची गंभीरता लक्षात घेत हायकोर्टानं येत्या सोमवारी म्हणजेच 16 मार्चला यावर तातडीची सुनावणी घेण्याचे निर्देश दिले आहेत.

कोरोनाचा देशातील पहिला बळी
देशात कोरोनानं पहिला बळी घेतला आहे. कर्नाटकातील कलबुर्गीत सौदी अरेबियातून आलेल्या 76 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झालाय. कर्नाटक सरकारच्या आरोग्य खात्यानं ही माहिती दिली आहे. इकडे महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ झालीय. कारण मुंबई, पुणे आणि ठाण्यात काल कोरोनाचे 3 नवे रुग्ण आढळलेत. त्यामुळेच आता राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 17 वर पोहोचली आहे. त्यात पुण्यात 10, मुंबईत 3, ठाणे, भिवंडीत 1, तर नागपुरात 2 रूग्ण कोरोनाग्रस्त आहेत. तर देशातील कोरोना ग्रस्तांचाआकडा आता 76 वर पोहचला आहे. ज्यात 16 परदेशी नागरिकांचा समावेश आहे.

Rajesh Tope On coronavirus | सरसकट कोरोनाबद्दलची टेस्ट करण्याचा आग्रह करू नका : राजेश टोपे