मुंबई : आर्थिक अडचणीत सापडलेल्या यस बॅकेचा संस्थापक राणा कपूरच्या ईडी कोठडीत मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयाने 16 मार्चपर्यंत वाढ केली आहे. बँकेचे सीईओ आणि व्यवस्थापक असताना त्यांनी तब्बल 30 हजार कोटी रुपयांची कर्ज समंत केली होती, अशी माहिती ईडीच्यावतीने बुधवारी न्यायालयात देण्यात आली. बुधवारी दुपारच्या सत्रात राणा कपूर यांना तपासयंत्रणेनं मुंबई सत्र न्यायालयातील पीएमएलए कोर्टात हजर केलं होतं.


YES BANK | घाबरण्याचं कारण नाही, तुमचे पैसे सुरक्षित; अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचं आश्वासन

या कर्जधारकांमध्ये अनेक बड्या आस्थापना आणि व्यक्ती असण्याची शक्‍यता असून याबाबत तपास करायचा आहे. या 30 हजार कोटींपैकी सुमारे 20 हजार कोटी रुपयांची कर्ज ही बुडीत कंपन्यांना दाखवली आहेत. राणा कपूर यांच्या कुटुंबियांच्या नावावर एकूण 78 कंपन्या असल्याची माहिती आहे. त्यामुळे कागदावर दाखवण्यासाठी या 20 हजारांपैकी संबंधित कंपन्यांना कर्ज दिली गेली आहेत का?, याचा तपासणी करणं गरजेचं आहे. तपासयंत्रणेला शंका आहे की हा सारा पैसा याच कंपन्यात विखुरलेला असण्याची दाट शक्यता आहे. तसेच बाकीचे 10 हजार कोटी कुठे गेले? याचीही सखोल चौकशी करणं आवश्यक आहे, अशी माहिती यावेळी तपासयंत्रणेकडून विशेष न्यायालयाला देण्यात आली.

YES Bank Crisis | येस बँक उद्ध्वस्त करण्यामागे थ्री सिस्टर्सचा हात

मात्र राणा हे तपासात सहकार्य करीत नाहीत, त्यामुळे त्यांचा रिमांड वाढवून द्या, अशी मागणी ईडीकडून करण्यात आली होती. त्यावर न्यायालयाने राणा यांना आणखीन पाच दिवसांची ईडी कोठडी देत अवधी 16 मार्चपर्यंत केला आहे. राणा कपूरला रविवारी ईडीनं अटक केली असून आरबीआयनं आर्थिक अनियमितता आढळल्यानं यस बँकेवरही निर्बंध लावले आहेत.

कोण आहेत राणा कपूर, त्यांच्यावर काय आहेत आरोप

एमबीए झाल्यानंतर राणा कपूर 1980 साली बँक ऑफ अमेरिकेत मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून कामाला सुरुवात केली. बँक ऑफ अमेरिकेसोबत तब्बल 16 वर्ष काम केलं. 2004 साली राणा कपूर यांनी नातेवाईक अशोक कपूर यांच्या सोबत येस बँकेची स्थापना केली. 26/11 च्या हल्ल्यात बँकेचे सहसंस्थापक अशोक कपूर यांचा मृत्यू झाला. अशोक कपूर यांच्या पत्नी आणि राणा कपूर यांच्यात भागीदारीवरुन वादाला सुरुवात झाली. राणा यांनी वैयक्तिक संबंधानुसार येस बँकेतून कर्ज देण्यास सुरुवात केली. अनिल अंबानींचा समूह, सीजी पॉवर, एस्सार पॉवरसारख्या समुहांना मोठं कर्ज दिलं. 2017 साली बँकेनं 6 हजार 355 कोटींची रक्कम बॅडलोन म्हणून घोषित केली. 2018 साली राणा कपूर यांच्यावर कर्ज आणि ताळेबंदीत गडबड केल्याचा आरबीआयनं आरोप केला. त्यानंतर रिझर्व्ह बँकेनं येस बँकेवर निर्बंध लावण्यास सुरुवात केली.