मुंबई:  मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai University)  कम्युनिकेशन अँड जर्नालिजम (Communication and Journalism) विभागात शिकत असलेल्या आणि परदेशात वास्तव्यास असलेल्या विद्यार्थिनीला सत्र चारची परीक्षा ऑनलाइन देण्याची मुभा दिल्याने, मुंबई विद्यापीठाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. 


मुंबई विद्यापीठाच्या कम्युनिकेशन अँड जर्नालिजम विभागाची परीक्षा 16 जून आणि 20 जून दरम्यान होणार आहे. या विद्यार्थिनीचे चौथ्या सत्राचे दोन पेपर वेळापत्रकानुसार आहेत आणि हीच परीक्षा ही विद्यार्थिनी आता परदेशात राहून ऑनलाइन पद्धतीने देणार आहे. इतर सर्व विद्यार्थी हीच परीक्षा ऑफलाईन देत असताना या विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षा देण्यास परवानगी कशी देण्यात आली ? अशी विचारणा विद्यार्थ्यांकडून केली जात आहे 


ऑनलाईन पद्धतीने परदेशातून परीक्षा देण्यास परवानगी


यासंदर्भात परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालकांकडून स्पष्टीकरण देण्यात आले, त्यांच्या म्हणण्यानुसार संबंधित विद्यार्थिनी ही या अभ्यासक्रमाची सत्र चारची परीक्षा देण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या सुरुवातीला जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार भारतात आली होती. मात्र काही कारणास्तव याच अभ्यासक्रमाची परीक्षा पुढे ढकलल्याने परदेशात जाण्याचे आरक्षण असल्याने विद्यार्थिनीला ही परीक्षा देणे शक्य होणार नव्हते. कशा प्रकारचा अर्ज तिने मुंबई विद्यापीठाकडे केला होता.  त्यामुळे या विद्यार्थिनीचे नुकसान होऊ नये, यासाठी विशेष अधिकारात या विद्यार्थिनीला ऑनलाईन पद्धतीने परदेशातून परीक्षा देण्यास परवानगी देण्यात आली आहे




ऐश्वर्या खाडकर असे विद्यार्थीनीचे नाव  आहे. विद्यार्थिनीने 31 मे रोजी ऑनलाईन परीक्षा संदर्भात  विद्यापीठ प्रशासनाला मेल केला होता. मुंबई विद्यापिठाने अशा प्रकारे विशेष अधिकारात या विद्यार्थिनीला दिलेल्या ऑनलाईन परीक्षेच्या परवानगीने विद्यापीठावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून इतर विद्यार्थ्यांना सुद्धा जर अडचण झाल्यास अशा प्रकारे विशेष सवलत दिली जाणार का ? असा प्रश्न विचारला जात आहे. 


कोरोना काळात ऑनलाईन शिक्षणावर भर देण्यात आला होता. त्यावेळची परिस्थिती लक्षात घेता विद्यापीठाच्या परीक्षाही ऑनलाईन घेण्यात आल्या होत्या. कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यानंतर पुन्हा ऑफलाईन परीक्षा घेण्यात आल्या. पण आताच्या या प्रकरणामुळे विद्यापीठासमोर पेच निर्माण झाला आहे. नियम तर सर्वांना समान असावेत असा विद्यार्थ्यांचा आग्रह आहे. संबंधित मुलीची विनंती लक्षात घेऊन त्या मुलीला ऑनलाईन परीक्षा देण्यास विद्यापीठाने मुभा दिली आहे. भविष्यात अशी मागणी अजून कोणी केली तर विद्यापीठ प्रशासन काय निर्णय घेणार असाही प्रश्न विद्यार्थ्यांतून विचारला जात आहे.


हे ही वाचा :


 परीक्षांचा निकाल जाहीर करण्यास विलंब झाल्यास कुलगुरुंना धरणार जबाबदार; राज्यपाल रमेश बैस यांचा इशारा