Mumbai Local Train : मुंबईत पुन्हा एकदा धावत्या लोकलमध्ये लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आल्याने महिलांच्या सुरक्षा संदर्भात सर्व बाजूंनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. लोकल ट्रेनमध्ये (Local Train) 20 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार (Sexual Assault) केल्याची धक्कादायक घटना घडली.  हार्बर मार्गावरील मस्जिद बंदर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) या स्थानकादरम्यान काल सकाळी 7.28 वाजता हा भीषण प्रकार घडला. पीडित तरुणी मुंबईतील गिरगाव इथली रहिवासी असून ती नवी मुंबईतील बेलापूर इथे एका परीक्षेला जात होती.  घटनेनंतर आरोपीला आठ तासात अटक करण्यात आल्याची माहिती जीआरपी अधिकाऱ्यांनी दिली. नवाज करीम (वय 40 वर्षे) आरोपीचं नाव आहे. या घटनेवर विरोधकांनी गृहखात्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले... देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उडवली जात आहे.  विरोधी पक्षनेते अजित पवार, सुप्रिया सुळे, वर्षा गायकवाड यांच्यासह विरोधी पक्षातील नेत्यांनी गृहखात्यावर निशाणा साधलाय. 


गृहखात्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना - अजित पवार


मुंबईत धावत्या लोकलमध्ये परिक्षेला निघालेल्या विद्यार्थीनीवर एका नराधमाने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, ही घटना अत्यंत संतापजनक आहे. गेल्या काही दिवसात राज्यात महिलांवरील अत्याचारात झालेली वाढ चिंताजनक असून गृहखात्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे, अशा तीव्र शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संताप व्यक्त करत या घटनेचा निषेध केला आहे. या घटनेचा युध्दपातळीवर तपास पूर्ण करुन सुरक्षा व्यवस्थेतील गंभीर हलगर्जीपणाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी  केली आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, मुंबईत लोकलच्या हार्बर मार्गावर धावत्या लोकलमध्ये सकाळच्या वेळेत विद्यार्थीनीवर अत्याचाराची घटना घडली. परीक्षेला जात असताना विद्यार्थीनीसोबत सकाळी साडे सातच्या सुमारास हा प्रकार घडला. गेल्या काही दिवसांत राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये झालेली वाढ चिंताजनक असून गृह खात्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे. ही घटना घाडली त्या लोकलच्या महिला डब्यांमध्ये पोलीस सुरक्षा व्यवस्था का नव्हती ?  याला कोण जबाबदार आहे ? सुरक्षा व्यवस्था असती तर एका विद्यार्थीनीवरील हा गैरप्रसंग टाळता आला असता. या घटनेचा युध्दपातळीवर तपास पूर्ण करुन सुरक्षा व्यवस्थेतील गंभीर हलगर्जीपणाची चौकशी सरकारने करण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. 







नेमकं चाललंय काय मुंबईत? - वर्षा गायकवाड 


या सरकारच्या सत्ताकाळात महिलांना सुरक्षा ही नाममात्र राहिली आहे. मुंबईतील वसतिगृहात मुलीवर अत्याचार व हत्येची घटना ताजी असतानाच चालत्या लोकल ट्रेनमध्ये महिला डब्यात एका तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आणि संतापजनक आहे.


सुरक्षित मुंबई आपण म्हणतो पण ती सद्यस्थितीत खरंच सुरक्षित राहिली आहे का? अशी घटना दिवसाढवळ्या घडतेच कशी? महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढतेय याला कारणीभूत हे सरकार आहे. मुंबईसह संपूर्ण राज्यात महिला विरोधी वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यात राज्याचे गृह खाते सपशेल अपयशी ठरले आहे. यांच्या सैल कारभारामुळे गुन्हेगारांना कायद्याचा वचक राहिलेला नाही. किमान सार्वजनिक ठिकाणी सुरक्षा व्यवस्था ही पूरक असावी. या सरकारचा जेवढा निषेध करावा तेवढा कमीच आहे. या घटनेतील नराधमाला फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून त्याला फाशीची शिक्षाच झाली पाहिजे. कोणताही हलगर्जीपणा न करता या घटनेची सखोल चौकशी व्हायला हवी, असे वर्षा गायकवाड म्हणाल्या. 



संतापजनक! - सुप्रिया सुळे


चालू लोकलमध्ये महिलांच्या डब्यात चढून एका व्यक्तीने तरुणीवर बलात्कार केल्याची घटना घडली. ही अतिशय संतापजनक घटना आहे.यामुळे पुन्हा एकदा मुंबई लोकलच्या सुरक्षेचा प्रश्न पुढे आला आहे. महाराष्ट्रात गुन्हेगारांना कायद्याची भीती राहिलेली नसून याला गृहखात्याची निष्क्रियता कारणीभूत आहे. या घृणास्पद घटनेतील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी तपासयंत्रणांनी कार्यवाही करणे गरजेचे आहे, अशी संतापजनक प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली. 






ही घटना नींदनीय - वळसे पाटील


मुंबईच्या हार्बर लोकल ट्रेनमध्ये विद्यार्थिनीवर झालेल्या बलात्काराची घटना नींदनीय आहे. शहरातील स्त्रियांच्या सुरक्षेविषयी त्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वृत्तपत्रातील जाहिरातींच्या चढाओढीत कायदा व सुव्यवस्थेचा विचारही करणे आवश्यक आहे, असे दिलीप वळसे पाटील म्हणाले.


गृह विभाग झोपा काढत आहे का? - प्राजक्त तनपुरे


धावत्या लोकल ट्रेनमधील महिला डब्यात एका 20 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे वृत्त अत्यंत धक्कादायक आहे. सुरक्षित शहर अशी ओळख असलेल्या मुंबईत एकामागून एक महिला अत्याचाराच्या घटना समोर येत असताना, गृह विभाग झोपा काढत आहे का? शहराची प्रतिमा दिवसेंदिवस मलिन होत आहे. जाहीर निषेध!... अशी प्रतिक्रिया प्राजक्त तनपुरे म्हणाले.