Maharashtra Education: राज्यपाल रमेश बैस यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी परीक्षांचा निकाल जाहीर करण्यास विद्यापीठ विलंब करत असल्याच्या स्थितीवर राज्यपालांनी कुलगुरुंना चांगलंच ठणकावलं आहे. कोणत्याही परीक्षेचा निकाल (Exam Result) लावण्यास विलंब झाल्यास थेट कुलगुरुंना जबाबदार धरलं जाईल, अशी तंबी राज्यपाल रमेश बैस (Governor Ramesh Bais) यांनी राज्यातील कुलगुरुंना दिली आहे.  


विद्यापीठांच्या विविध परीक्षांचे निकाल 30 दिवसांत आणि उशिरात उशिरा 45 दिवसांच्या आत लावण्याचे बंधन असताना देखील बहुसंख्य विद्यापीठं निकाल लावण्यास अक्षम्य विलंब करत आहेत, असे निरीक्षण राज्यपालांनी नोंदवले. विद्यापीठांच्या निकालासोबत विद्यार्थ्यांचे भवितव्य निगडीत असल्याने सर्व विद्यापीठांनी हा विषय अतिशय गांभीर्याने घेणं आवश्यक असल्याचं राज्यपालांनी म्हटलं. 


राज्यपाल आणि विद्यापीठांचे कुलपती रमेश बैस यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील काही पारंपरिक, कृषी, आरोग्य विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठांच्या कुलगुरुंची बैठक सोमवारी राजभवनावर पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. आगामी 2023-24 शैक्षणिक सत्रापासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणी संदर्भात विद्यापीठांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेण्यात आली होती. तसेच, विद्यापीठांशी निगडित सामायिक विषयांवर चर्चा करण्यासाठी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. याच विषयावर राज्यातील उर्वरित विद्यापीठांची दुसरी बैठक नागपूरमध्ये घेणार असल्याचं राज्यपालांनी सांगितलं.  


नवे शैक्षणिक धोरण लागू करण्यासाठी अवघ्या एक ते दोन महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. धोरणाच्या उत्तम अंमलबजावणीबाबत महाराष्ट्राने देशापुढे उदाहरण सादर करावे, अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली.  विविध परीक्षांचे निकाल (Exam Result) वेळेवर न लागल्यामुळे पुढचे शैक्षणिक वेळापत्रक चुकते, अशी खंत राज्यपालांनी व्यक्त केली. त्यामुळे निकाल वेळेवर लावले पाहिजे, तसेच गुणपत्रिकांचे वितरण (Marksheet Distribution) देखील वेळेवर झाले पाहिजे, असं राज्यपालांनी सांगितलं.  


अनेकदा इतर विद्यापीठांमध्ये किंवा परदेशी विद्यापीठांमध्ये (Foreign University) प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना गुणपत्रिकेची (Marksheet) किंवा तात्पुरत्या पदवी प्रमाणपत्राची (Degree Certificate) गरज असते. विद्यापीठांकडून प्रतिसाद न मिळाल्याने विद्यार्थी विद्यापीठास पत्र लिहितात, अशा विद्यार्थ्यांच्या समस्येकडे विद्यापीठांनी संवेदनशीलतेनं पहावं, असं राज्यपालांनी सांगितलं.      


काही दिवसांपूर्वी 200 विद्यार्थ्यांना एका विषयात चुकून शून्य गुण मिळाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. अशा चुका टाळल्या पाहिजे आणि चूक झाल्यास विद्यार्थ्यांना त्वरित दिलासा दिला पाहिजे, असं राज्यपालांनी ठणकावून सांगितलं.  


हेही वाचा:


समीर वानखेडेंनी आर्यन खानला सोडण्यासाठी शाहरुखकडे 25 कोटी मागितले? सीबीआयच्या FIR मधून गंभीर आरोप


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI