Mumbai to Belapur Water Taxi : बहुप्रतीक्षित मुंबई (Mumbai) ते बेलापूर (Belapur) वॉटर टॅक्सीचा मुहुर्त अखेर निश्चित झाला आहे. महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट यांची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या वॉटर टॅक्सी सेवेचं उद्घाटन उद्या 17 फेब्रुवारी रोजी करण्यात येणार आहे.
बेलापूर येथून प्रत्येकी 10 ते 30 प्रवासी क्षमता असलेल्या 7 स्पीडबोटी आणि 56 प्रवासी क्षमता असलेली एक कॅटामरान बोट अशा एकूण 8 बोटींद्वारे वॉटर टॅक्सी सेवा सुरु करण्यात येत आहे. बेलापूर येथून दक्षिण मुंबईत भाऊचा धक्का येथे पोहोचण्यास स्पीड बोटीने फक्त 30 मिनिटं तर कॅटामरान बोटीला 45 ते 50 मिनिटांचा कालावधी लागणार आहे. स्पीडबोटीचं भाडं प्रति प्रवासी 800 ते 1200 रुपये तर कॅटामरान बोटीकरीता प्रति प्रवासी 290 रुपये इतकं ठेवण्यात आलं आहे. बेलापूर येथून भाऊच्या धक्क्याबरोबरच एलिफंटा, जेएनपीटी या जलमार्गावरसुद्धा प्रवासी सेवा चालवण्यात येणार आहे.
मुंबईच्या पूर्व किनारपट्टीवरील जलवाहतूकीचा पुढील टप्पा म्हणून नवी मुंबईपासून मुंबई, एलिफंटा, जेएनपीटी अशा विविध जलमार्गांवर प्रवासी वाहतूक सुरु करण्यासाठी बेलापूर, नवी मुंबई येथे सुमारे 8.37 कोटी खर्च करुन प्रवासी जेट्टीचं बांधकाम करण्यात आलं आहे. केंद्र आणि राज्य शासनामार्फत 50 : 50 प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील बंदरे आणि खाड्यांमधून दरवर्षी सुमारे 2 कोटी प्रवासी जलवाहतूकीद्वारे प्रवास करतात. जलवाहतूकीचा पर्याय हा किफायतशीर, इंधन आणि वेळेची बचत करणारा आणि पर्यावरणस्नेही असतो. मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे यांसारख्या वाहतूककोंडीची समस्या भेडसावणाऱ्या शहरांसाठी तसेच हळूहळू अलिबागपर्यंत विस्तारत जाणाऱ्या लोकवस्तीसाठी रस्ते आणि रेल्वे वाहतूकीला पर्याय म्हणून मुंबईच्या पूर्व किनारपट्टीवर जलवाहतूक सुरु करण्याचा निर्णय राज्यसरकारनं घेतला आहे.
या वॉटर टॅक्सी सेवेमुळं नवी मुंबईत निर्माणाधीन असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सुद्धा जोडणी मिळणार आहे. नवी मुंबईमधून थेट एलिफंटा येथे जाण्यासाठी सेवा मिळणार असल्याने पर्यटनालासुद्धा चालना मिळणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- नवी मुंबईत गणेश नाईक आणि भाजपला मोठा धक्का, लवकरच नऊ नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार
- अमिताभ बच्चन यांचे माजी अंगरक्षक जितेंद्र शिंदे पोलीस दलातून निलंबित, विभागीय चौकशी करण्याचे आदेश
- सहा महिने वृद्धाश्रमात सेवा करा; गुन्हा रद्द करण्याची मागणी करणाऱ्या पाच तरुणांना हायकोर्टाची अनोखी शिक्षा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha