मुंबई: ऑनलाईन गेमिंगमधील गुंतवणुकीच्या संदर्भात खंडणी आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप असलेल्या पाच तरुणांना हायकोर्टानं 6 महिने वृद्धाश्रमात जाऊन सेवा कण्याची अनोखी शिक्षा सुनावली आहे. याप्रकरणी दाखल फौजदारी खटल्यामुळे नोकरी मिळण्यास अडचणी येत असल्यामुळे, हा गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी मागणी करणारा या तरूणांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. 


या घटनेनंतर आपली नोकरी गेली आणि गुन्हा नोंद असल्यानं नवी नोकरीही मिळत नाही. त्यामुळे हा दाखल गुन्हा रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी पाचही आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर न्यायमूर्ती प्रसन्न वराळे आणि न्यायमूर्ती अनिल किल्लोर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. तक्रारदाराच्या सहमतीनं हे प्रकरण परस्पर मिटविण्यात आलं असून दाखल झालेला गुन्हा रद्द झाल्यास तक्रारदारालाही हरकत नाही असंही पोलिसांच्या वतीनं हायकोर्टात सांगण्यात आलं. मात्र दाखल गुन्हा रद्द करताना केलेल्या गुन्हाची अद्दल घडावी, म्हणून हायकोर्टानं पाचही आरोपींना पुढचे सहा महिने पहिल्या आणि तिसऱ्या रविवारी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत पुण्यातील 'निवार' वृद्धाश्रमात काम करण्याची शिक्षा सुनावली. तसेच सहा महिन्यांनी तिथं काम केल्याचं प्रमाणपत्र न्यायालयात सादर करण्याचे निर्देशही दिले आहेत. तसेच या पाच जणांनी ऑनलाइन गेमिंगमधील मोठ्या नफ्याच्या हव्यासापोटी पैसे पुरविणाऱ्या तक्रारदार मित्रालाही त्यांच्यासोबत तिथं सेवा करण्याचे आदेश हायकोर्टानं दिले आहेत.


तंत्रज्ञान क्षेत्रात काम करत असलेल्या पाच तरूणांनी आपल्या ओळखीच्याच एका व्यक्तीला ऑनलाइन गेमिंगमध्ये मोठा नफा कमावून देण्याच्या नावाखाली पैसे गुंतवण्यास प्रवृत्त केलं होतं. त्या तरूणानं त्यांच्यावर विश्वास ठेवत पैसेही गुंतवले. मात्र, त्याने नंतर आपले पैसे परत मागितले असता आरोपींनी त्याला जीवे मारण्याची धमकी दिली आणि वर त्याच्याकडे आणखीन पैसे मागितले. यामुळे व्यथित होऊन तरुणाने 6 एप्रिल 2021 रोजी पुण्यातील वानवडी पोलीस स्थानकांत आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी पाच आरोपींविरोधात आयपीसी कलम 365, 384, 504, 506 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल केला होता.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha