महिला पोलीस धक्काबुक्की प्रकरण : संदीप देशपांडे, संतोष धुरी यांच्या अटकपूर्व जामीनावर आज फैसला
संदीप देशपांडे, संतोष धुरी यांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. महिला पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्कीच्या आरोपाखाली शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे
MNS Leader Sandeep Deshpande : महिला पोलीस धक्काबुक्की प्रकरणी मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande), संतोष धुरी (Santosh Dhuri) यांच्या अटकपूर्व जामीनावर आज निर्णय होणार आहे. मुंबई सत्र न्यायालयात आज सुनावणी होईल. घटनेच्या दिवसापासून दोन्ही नेते पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
मनसेने काही दिवसांपूर्वी मशिदींवरील भोंग्यांविरोधात आंदोलन केलं होतं. कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांकडून मनसे नेते आणि पदाधिकाऱ्यांची धरपकड सुरु होती. त्यातच 4 मे रोजी राज ठाकरे यांचं निवासस्थान शिवतीर्थाबाहेर संदीप देशपांडे माध्यमांशी बोलत असताना पोलीस तिथे त्यांना ताब्यात घेण्यासाठी आले. आम्ही येतो असं सांगत संधी मिळताच संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी तिथून पळ काढला. पोलीस त्यांच्या मागे धावले. परंतु या सगळ्या झटापटीत संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्यामुळे महिला पोलीस जखमी झाल्या होत्या. तेव्हापासूनच मुंबई पोलिसांकडून त्यांची शोधाशोध सुरु आहे. पण बेपत्ता असलेल्या दोन्ही मनसे नेत्यांनी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली असून त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी पार पडणार आहे. दरम्यान, संदीप देशपांडे यांचा ड्रायव्हर 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आहे.
मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबईतील सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. महिला पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की केल्याच्या आरोपाखाली मुंबईतील दादरच्या शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी 4 मेचा अल्टिमेटम दिला होता. प्रतिबंधात्मक कारवाई दरम्यान पोलिसांनी संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या हातावर तुरी देऊन दोन्ही नेत्यांनी कारमधून पळ काढला. यावेळी एक महिला पोलीस कर्मचारी जखमी झाली. दरम्यान, आज सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन नाकारल्यास संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.
मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांचे अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न सुरु आहेत. एकीकडे देशपांडे यांच्या जामिनासाठी मनसेची विधी सेल कामाला लागली आहे. तर, दुसरीकडे देशपांडे यांच्या शोधासाठी मुंबई क्राईम ब्रांचकडून विशेष पथकं रवाना करण्यात आली आहेत. मुंबईसह उरण, कर्जत भागात या दोघांचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे.
नेमकं काय घडलं?
मुंबईतील शिवाजी पार्क राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानाबाहेर संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. माध्यमांशी बोलणं झाल्यानंतर संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना पोलिसांनी ताब्यात घेत असल्याचं सांगितलं. त्यावेळी संदीप देशपांडे यांनी आम्ही तुमच्यासोबत येत असल्याचं पोलिसांना सांगितलं. काही अंतर पोलिसांसोबत चालल्यानंतर संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे देशपांडे यांच्या खासगी गाडीत बसले. त्यावेळी पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. पण गाडी न थांबवताच ते तिथून निघून गेले. त्यांची गाडी भरधाव वेगानं जात असताना एक महिला पोलीस जखमी झाली. संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी पोलिसांना गुंगारा देत पळ काढल्यानंतर त्यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं खरं. पण पोलिसांनी याप्रकरणी संदीप देशपांडेंवर गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध घेत आहेत. एवढंच नाहीतर संदीप देशपांडेंना शोधण्यासाठी पोलीस राज ठाकरेंच्या शिवतीर्थावरही पोहोचले होते.