मुंबई: मुंबईतील गोरेगाव परिसरात मंगळवारी एक भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये 13 वर्षांच्या शाळकरी मुलीचा मृत्यू झाला आहे. गोरेगाव पूर्वेकडील ओबेरॉय मॉलसमोरील रस्त्यावर हा अपघात (Road Accident) झाला. यावेळी रस्त्यावरुन भरधाव वेगात जाणाऱ्या डंपरने एका दुचाकीला जोरात धडक दिली. तेव्हा दुचाकी डंपरखाली आली आणि त्यावर बसलेल्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला.


ही 13 वर्षांची मुलगी सकाळी आपल्या वडिलांसोबत सेंट झेवियर्स शाळेत जाण्यासाठी निघाली होती. रस्त्यावरुन जाताना त्यांच्या दुचाकीला डंपरने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, बाईकवर पाठीमागे बसलेल्या मुलीच्या अंगातून प्रचंड रक्तस्त्राव झाला. त्यामुळे मुलीने जागेवरच प्राण सोडले. या अपघातामध्ये तिच्या वडिलांनाही गंभीर दुखापत झाली. या अपघातानंतर ते कितीतरी वेळ मुलीचा मृतदेह आपल्या मांडीवर घेऊन रस्त्यावरच बसून होते. यावेळी आजुबाजूला बघ्यांची गर्दी झाली होती. काहीवेळानंतर मुलीच्या वडिलांना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 


डंपर चालकाला अटक


अपघातानंतर पोलीस त्वरीत घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी डंपर चालकाला अटक केली आणि अपघाताचा अधिक तपास सुरु केला आहे. या घटनेमुळे चिमुरडीच्या कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. मुलीच्या मृत्यूने तिच्या मित्र परिवारासह शेजारीही शोकसागरात बुडाले आहेत.


मनोर पालघर रोडवर अपघात


मनोर पालघर रोडवर सोमवारी रात्री भीषण अपघात झाला. यामध्ये  इनोव्हा कारने बाईकवरुन जाणाऱ्या दोघांना उडवले. या अपघातामध्ये तीनजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शासकीय रुग्णालय आणि आस्था हॉस्पिटल मनोर येथे उपचार सुरू आहेत.


आणखी वाचा


माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या मुलीचा अपघात; भरधाव पिकअपची कारला धडक


सरफराज खानच्या भावाचा भीषण अपघात; कार 4-5 वेळा उलटली, मुशीर खानसह वडिलांवर रुग्णालयात उपचार सुरु