Musheer Khan Accident: भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू सरफराज खान याचा भाऊ मुशीर खानचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. कारने वडिलांसोबत कानपूरहून लखनौला जात असताना भीषण अपघात झाला. यावेळी मुशीर खानची कार जवळपास तीन ते चारवेळा उलटली. यामध्ये मुशीर खान गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या मुशीर खान आणि त्याच्या वडिलांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
इराणी चषकाचा सामना 1 ते 5 ऑक्टोबर दरम्यान लखनौच्या एकना स्टेडियमवर मुंबई आणि रेस्ट ऑफ इंडिया यांच्यात खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी मुशीर खानचा अपघात हा मुंबईसाठी मोठा धक्का आहे. तसेच 11 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या रणजी ट्रॉफीच्या सुरुवातीच्या सामन्यांनाही मुशीर खान बाहेर पडण्याची शक्यता आहे.
वडिलांसोबत प्रवास-
मिळालेल्या माहितीनूसार, मुशीर खान इराणी चषकासाठी मुंबई संघासोबत लखनौला गेला नव्हता. अपघात झाला तेव्हा तो बहुधा आझमगडहून लखनऊला त्याच्या वडिलांसोबत प्रवास करत होता.
दुलीप ट्रॉफीमधील खेळी-
नुकत्याच झालेल्या दुलीप ट्रॉफीमध्ये मुशीर खान चमत्कार करताना दिसला होता. मुशीर खान या स्पर्धेत भारत ब संघाकडून खेळला होता. मुशीरने पहिल्या सामन्याच्या पहिल्या डावात 181 धावा केल्या होत्या, त्यानंतर त्याला भारतीय संघात आणण्याची मागणी जोर धरू लागली. मात्र, पुढच्या चार डावांत मुशीर दोनदा खाते न उघडता बाद झाला.
मुशीर खानची आतापर्यंतची कारकीर्द-
मुशीर खानने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत 9 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या 15 डावात फलंदाजी करताना त्याने 51.14 च्या सरासरीने 716 धावा केल्या आहेत. या कालावधीत, त्याने 3 शतके आणि 1 अर्धशतक झळकावले आहे, ज्यामध्ये त्याने नाबाद 203 धावा केल्या होत्या.
अजिंक्य रहाणे करणार मुंबई संघाचे नेतृत्व
क्रिकबझच्या वृत्तानुसार, इराणी कपमध्ये अजिंक्य रहाणे मुंबई संघाचे नेतृत्व करणार आहे. याशिवाय श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर यांनी संघात स्थान मिळाले आहेत. श्रेयस टीम इंडियाच्या संघातून बाहेर आहे आणि भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी त्याची निवड झालेली नाही. या कारणास्तव तो दुलीप ट्रॉफीमध्ये खेळताना दिसला, जिथे त्याने इंडिया-डी संघाचे नेतृत्व केले. बुची बाबू स्पर्धेतही तो खेळला होता. पण अय्यरची बॅट शांत राहिली.
संबंधित बातमी:
जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सची साथ सोडण्याच्या तयारीत; कोणत्या संघासोबत सुरु आहे चर्चा?