मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला असताना एक खळबळजनक माहिती समोर  आली आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर एकमेकांचे कट्टर वैरी झालेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यात पडद्यामागे चर्चा सुरु असून या दोघांची एक गुप्त भेट झाल्याचे सांगितले जात आहे. वंचित बहुजन आघाडीचे (VBA) प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी हा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप होणार का, अशा चर्चांना उधाण आले आहे.


सिद्धार्थ मोकळे यांच्या दाव्यानुसार भाजप आणि ठाकरे गटात सध्या गुप्तपणे बोलणी सुरु असल्याचे संकेत मिळत आहेत. मोकळे यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना सांगितले की, वंचित बहुजन आघाडीला मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी 25 जुलै रोजी दिल्लीतील 7 डी मोतीलाल मार्ग याठिकाणी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेतली. त्यानंतर दहा दिवसांनी म्हणजे 5 ऑगस्ट रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी गेले होते. यावेळी ते एकटेच होते, ते स्वत: गाडी चालवत मातोश्रीवर गेले होते. मातोश्रीवर देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात दोन तास बैठक झाली, असा दावा सिद्धार्थ मोकळे केला.


उद्धव ठाकरेंच्या दिल्लीत गुप्त गाठीभेटी


देवेंद्र फडणवीस हे मातोश्रीवर येऊन गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 6 ऑगस्टला उद्धव ठाकरे हे दिल्लीला गेले होते. यावेळी त्यांच्यासोबत कोण होते? दिल्लीत त्यांनी कोणाच्या गाठीभेटी घेतल्या, या बैठकांमध्ये काय ठरलं? हे सगळं उद्धव ठाकरे यांनी जनतेसमोर स्पष्टपणे सांगितले पाहिजे. वंचितला मिळालेली माहिती आम्ही जनतेसमोर ठेवत आहोत. कारण लोकसभा निवडणुकीत आरक्षणवादी असलेल्या मतदारांनी भाजपविरोधात मतदान केले होते. भाजप आरक्षणविरोधी आहे, त्यांना माहिती होते. याच आरक्षणवादी मतदारांनी ठाकरे गटाच्या उमेदवारांना मतदान केले होते. गेल्या पाच वर्षांमध्ये महाराष्ट्रात अनेक उलटसुलट राजकीय घडामोडी घडल्या आहेत. पु्न्हा तसं घडलं तर आरक्षणवादी जनतेची फसवणूक होऊ नये, यासाठी आम्ही ही सगळी माहिती जनतेसमोर मांडत असल्याचे सिद्धार्थ मोकळे यांनी सांगितले. 


VIDEO: देवेंद्र फडणवीस मध्यरात्री उद्धव ठाकरेंना भेटायला एकटेच बाहेर पडले?



आणखी वाचा


आरक्षण संपवण्याच्या हालचाली, पडद्यामागे भाजप-ठाकरे गटाच्या गुप्त वाटाघाटी; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप


उद्धव ठाकरे इतका घातकी माणूस महाराष्ट्रात कोणीही नाही; माथाडी नेते नरेंद्र पाटलांची घणाघाती टीका