'रस्ते खड्डेमुक्ती' ठेवण्यासाठी रॅपिड हार्डनिंग कॉंक्रिट आणि रॅपिड अस्फाल्ट तंत्रज्ञानाचा होणार वापर
Mumbai: मुंबईच्या रस्त्यावर दरवर्षीच्या पावसाळी पाण्यामुळे निर्माण होणारी खड्ड्यांची समस्या पाहता अत्याधुनिक तंत्रज्ञानाने व जलदगतीने हे खड्डे भरण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) नियोजनाला सुरूवात केली आहे.

Mumbai: मुंबईच्या रस्त्यावर दरवर्षीच्या पावसाळी पाण्यामुळे निर्माण होणारी खड्ड्यांची समस्या पाहता अत्याधुनिक तंत्रज्ञानाने व जलदगतीने हे खड्डे भरण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) नियोजनाला सुरूवात केली आहे. येत्या पावसाळ्याचा कालावधी पाहता रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी आणि खराब भाग दुरूस्तीसाठी महानगरपालिकेने पावसाळा पूर्व कामांमध्ये रॅपिड हार्डनिंग कॉंक्रिट (एम 60) आणि रिअॅक्टिव्ह अस्फाल्ट तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे नियोजन केले आहे. अतिरिक्त आयुक्तांकडे रस्ते विभागाच्या नुकत्याच झालेल्या एका बैठकीनुसार दोन्ही तंत्रज्ञानाच्या माध्यमातून खड्डे बुजवण्यासाठी अधिकाधिक कंपन्यांनी प्रतिसाद द्यावा, यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.
नव्या तंत्रज्ञानाने रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी विशिष्ट पद्धतीचा वापर करण्यात येणार आहेत. या पद्धतीमध्ये खड्डे विशिष्ट आकारात कापणे व योग्य तंत्रज्ञानाने भरणे यासारख्या कामांचा समावेश आहे. या कामांचा दोषदायित्व कालावधी (डिफेक्ट लायबिलिटी पिरियड) तीन वर्षांसाठीचा असणार आहे. त्यामुळे या कालावधीत रस्त्यांवर खड्डे होणार नाहीत, याची जबाबदारी संबंधित कंत्राटदाराची असणार आहे. या कामासाठी ज्या पुरठादारांकडे रेडीमिक्स कॉंक्रिट प्रकल्प आहे. तसेच रिअॅक्टिव्ह अस्फाल्ट आणि रॅपिड हार्डनिंग कॉंक्रिट तंत्रज्ञान पुरवण्याची तयारी आहे, अशा पुरवठादारांना महानगरपालिकेने या कामासाठी आवाहन केले आहे. तसेच या तंत्रज्ञानाने साहित्य पुरवठा करणाऱया कंपन्यांनाही या निविदा प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. इच्छुक पुरवठादारांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत विविध ठिकाणी खड्डे बुजवण्याच्या कामाचे मोफत प्रात्यक्षिक देणे अपेक्षित आहे.
रॅपिड हार्डनिंग कॉंक्रिट आणि रिअॅक्टिव्ह अस्फाल्ट या दोन्ही तंत्रज्ञानाने रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठीचे तसेच खराब भाग दुरूस्तीचे प्रात्यक्षिकही याठिकाणी देणे अपेक्षित आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देतानाच काही पुरवठादारांनी या प्रक्रियेत सहभाग नोंदवला आहे. आतापर्यंत रिअॅक्टिव्ह अस्फाल्टसाठी दोन पुरवठादारांनी तर रॅपिड हार्डनिंग कॉंक्रिटला तीन पुरवठादारांनी प्रतिसाद दिला आहे. गत वर्षीच्या पावसाळ्यातील कालावधीत मुंबई महानगरपालिकेच्या रस्ते विभागाने रॅपिड हार्डनिंग कॉंक्रिट आणि रिअॅक्टिव्ह अस्फाल्ट या दोन पद्धतीने खड्डे भरण्याचे प्रात्यक्षिक मुंबईच्या रस्त्यांवर केले होते. त्यामध्ये रॅपिड हार्डनिंग कॉंक्रिटचा वापर करून खड्डे भरल्यानंतर अवघ्या सहा तासांमध्ये रस्ता वाहतुकीसाठी खुला करणे शक्य झाले होते. मुंबईतील पावसाळा कालावधीत रस्ते खड्डे मुक्त रहावेत तसेच आगामी गणेशोत्सव कालावधीसाठी विनाअडथळा हा सण पार पडावा यासाठी योग्य कार्यवाही करण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त वेलरासू यांनी रस्ते विभागाला दिले आहेत.
























