Mumbai Rains Updates: मुंबई : संपूर्ण राज्यभरात मान्सून (Maharashtra Monsoon Updates) पसरला आहे. अनेक भागांत पावसाची संततधार (Rain Updates) पाहायला मिळत आहे. पण, काही भागांत अद्यापही पावसानं दडी मारल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच मुंबईकरांना (Mumbai Rains) मात्र पावसानं दिलासा दिला आहे. मुंबईत कालपासूनच (बुधवार) पावसाची संततधार पाहायला मिळत आहे. मुंबईतील काही भागांत आजही पहाटेपासूनच पाऊस सुरू आहे. अशातच हवामान विभागानं मुंबई, ठाण्यासह कोकण किनारपट्टीलगतच्या भागांत पुढील चार दिवस पावसाचा अंदाज वर्तवला आहे.                                           

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, सिंधुदुर्गपासून ठाण्यापर्यंत किनारपट्टीसाठी पुढील चार दिवस पावसाची संततधार पाहायला मिळेल. त्यासाठी हवामान विभागानं यलो अलर्ट जारी केला आहे. तसेच, चार दिवस मुंबईसह किनारपट्टीवर मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.                                                          

पश्चिम महाराष्ट्रातही आज पावसाचा जोर पाहायला मिळेल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. प्रामुख्यानं पुणे, सातारा जिल्ह्यांत पावसाचा जोर राहणार आहे. दरम्यान, गेल्या आठवडाभरापासून मान्सूनची आगेकूच रखडली होती, मात्र आता मोसमी वाऱ्यांसाठी अनुकूल वातावरण असल्यामुळे संपूर्ण राज्यभरात पाऊसाची रिमझिम लवकरच पाहायला मिळणार आहे. दरम्यान, बुधवारी दिवसभरात अलिबागमध्ये 38, डहाणूत 58, हर्णेत 11, सांताक्रुजमध्ये 6 आणि रत्नागिरीत 14 मिमी पाऊस पडला आहे.                     

1 जून ते 18 जून दरम्यान राज्यातील महत्त्वाच्या शहरांमध्ये झालेल्या पावसाची सरासरी                                 

जिल्हा पावसाची सरासरी
मुंबई शहर  146.3 ते 268.6
पुणे  122.6 ते 92.9
रत्नागिरी  280.2 ते 398.9
सिंधुदुर्ग  386.1 ते 461.1
कोल्हापूर  100 ते 171.8
सांगली  123 ते 77.2
सातारा  113.2 ते 100.7
नागपूर  40 ते 68.7

गेल्या आठवडाभरापासून मान्सूनची आगेकूच रखडली होती. त्यामुळे राज्यभरात पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याचं पाहायला मिळालं होतं. पण, आता अरबी समुद्रावरुन येणाऱ्या नैऋत्य मान्सूनचा जोर चांगलाच वाढल्याचं पाहायला मिळतंय. पुढील चार दिवस किनारपट्टीसह पश्चिम घाटाच्या परिसरात चांगला पाऊस होण्याचा अंदाज आहे.