मुंबई: शिवसेनेचा वर्धापन दिन गाजला तो दोन्ही शिवसेनेच्या (Shivsena) नेत्यांनी केलेल्या भाषणांमुळे. मुंबईतील षण्मुखानंद हॉल येथे ठाकरेंच्या शिवसेनेचा तर वरळी डोम येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) शिवसेनेचा 58 वा वर्धापन साजरा झाला. यावेळी, उद्धव ठाकरेंनी भाजपला लक्ष्य करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. तसेच, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवरही जोरदार निशाणा साधला. उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) ठाकरेस्टाईलने भाषण करत शिंदेंना चॅलेंजही दिले. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरुन ठाकरेंना लक्ष्य केले. तसेच, लोकसभा निवडणुकीत उबाठापेक्षा आपल्याला अधिक यश मिळालं. म्हणजे जनतेच्या कोर्टात न्याय झाल्याचं एकनाथ शिंदेंनी म्हटले. तसेच, मुंबईतील जय-पराजयावरही भाष्य केलं. तसेच,ईव्हीएमच्या मुद्दयावरुन टीका करणाऱ्यावर पलटवारही केला.
बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देताना मला वेगळा आनंद होत असून आज वेगळी भावना आहे. 1966 साली बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली. मराठी माणूस हा बाळासाहेबांचा केंद्र होता. शिवसेना पूर्ण देशात हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना म्हणून लोकप्रिय झाली, अशा शब्दा शिंदेंनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. लोकसभा निवडणुकांचं विश्लेषण करताना अप्रत्यक्षपणे मुस्लीम मतं त्यांना मिळाल्याचे सांगत काही मतदान केंद्रांवरील आकडेवारीच दिली.
गिरे तो भी टांग उपर
महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत 13 जागांवर आपण आणि उद्धव ठाकरे समोरासमोर लढलो. त्यापैकी, आपण 7 जागा जिंकलो. मग, त्यांच्यापेक्षा सरस कोण? खरी शिवसेना... बाळासाहेबांची शिवसेना कोणाची, असा सवाल करत जनतेनं आपल्याला कौल दिल्याचं शिंदेंनी म्हटले. ग्रामपंचायतीमध्येच जनतेने ट्रेलर दाखवलेला, आपले 2200 सरपंच निवडून आले होते. देशातील लोकसभा निवडणुकांच्या जागांचा विचार केल्यास काँग्रेस काठावर पण पास नाही झाली. पण उन्माद इतका की जणू देशात सरकार आले आणि दुसरीकडे उबाठाजीत का जश्न मना रही है. गिरे तो भी टांग उपर.. असे म्हणत शिंदेंनी निवडणुकांवरील विजयी सेलिब्रेशनवर भाष्य केले.
तर यामिनी जाधव अन् शेवाळेही निवडून आले असते
दक्षिण मुंबईत यामिनी जाधव यांचा पराभव झाला. कशाच्या जीवावर कोणाच्या मताने तिथे विरोधी उमेदवार जिंकले. राहुल शेवाळे यांचेही असेच झाले आहे, असे म्हणत एकनाथ शिंदेंनी यामिनी जाधव यांच्या मतदारसंघातील काही मतदान केंद्रावर पडलेल्या मतांची आकडेवारीच वाचून दाखवली. त्यामध्ये, शिवसेना शिंदेंच्या उमेदवारास केवळ 4 आणि 5 मतं मिळाली होती. त्या तुलनेत महाविकास आघाडीला 700 ते 800 पार एवढी मतं होती. यावरुन मुस्लीम मतं कोणाला मिळाली, हे सर्वांना माहिती आहे, असेच शिंदेंनी सूचवले. तसेच ईव्हीएमच्या मुद्द्यावर भाष्य करताना, या पराभवांचा दाखलाही दिला. ईव्हीएम हॅक केलं असतं तर यामिनी जाधव अन् राहुल शेवाळेही निवडून आले असते, असेही शिंदेनी म्हटले.
ईव्हीएमवरुन शिंदेंचा पलटवार
महाविकास आघाडीतील नेत्यांकडून ईव्हीएम मशिनवर प्रश्न उपस्थित केले गेले. मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघातील रवींद्र वायकर यांच्या विजयावर भाष्य करत शिंदेंनी ईव्हीएमवरुन विरोधकांना टोला लगावला. गोवंडी, ट्रॉम्बे, धारावी, अनुशक्तीनगर भागात आपला लीड गेला. तिथे कोणता मोबाईल फोन लाऊन ईव्हीएम हॅक केलं होतं का?, असा सवाल उपस्थित करत रवींद्र वायकर यांच्या विजयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांवर पलटवार केला. येथील मतदारसंघात आम्ही संशय घेतला नाही, कोणता OTP टाकला हे आम्ही विचारलं नाही. वायकर यांचा विजय जनतेचा विजय आहे, हा मेरिटवर काढलेला विजय आहे, खऱ्या शिवसेनेचा विजय आहे, असे म्हणत रवींद्र वायकर यांच्या मतदारसंघात सुरू असलेल्या वादावरुनही शिंदेंनी शिवसेना ठाकरे गटावर पलटवार केला. तसेच, उबाठा हा खोटा आणि रडा पक्ष आहे, त्यांना रड्या गट बोलू, असेही शिंदेंनी म्हटले.
उबाठाचे हात थरथरले का नाहीत
उबाठा आणि काँग्रेस दोघेही व्होट बँकने निवडून आले, सत्तेसाठी बाळासाहेबांचे विचार सोडणारे ते लाचार आहेत. काँग्रेसने बाळासाहेबांच्या मतदानाचा अधिकार काढून घेतलेला, मग काँग्रेसला मतदान करताना उबाठाचे हात थरथरले का नाहीच. आता, तुम्ही विचारांचे वारसदार कसे होऊ शकतात, असे म्हणत शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला.
आणखी तीन-चार जागा जिंकलो असतो
धनुष्यबाण पेलण्याची हिंमत मनगटात लागते, ते आपल्या शिवसेनेत आहे. म्हणून धनुष्यबाणाला लोकांनी मतदान केले. एवढी कसली लाचारी. बाळासाहेबांच्या विचारांना तुम्ही तिलांजली दिली. लोकसभेच्या आणखी तीन चार जागा नक्की जिंकलो असतो. आपण का जागा हरलो ते आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यात जाऊ इच्छित नाही. महायुती आपल्याला ताकदीने पुढे न्यायाची आहे. या महायुतीत मी मुख्यमंत्री आहे. म्हणून माझी जबाबदारी जास्त आहे. ही जबाबदारी मी पार पाडेन याचा विश्वास मी देतो. या वावटळीमध्ये शिवसेनेचा मुळ जो आधार आहे, जो मतदार आहे तो दुसरीकडे गेला नाही. आपल्याकडे वळला, याचे उदाहरण शिवसेनेचे 19 टक्के मतदार होते, त्यापैकी 14.5 टक्के मतदार हे आमच्या शिवसेनेकडे आले आणि साडेचार टक्के मते तिकडे राहिली. मग इतर मते कशी आली, कुठून आली, उमेदवार कसे जिंकले हे महाराष्ट्राला माहिती. ही तात्पुरती आलेली सूज आहे, ती पण उतरते, असे म्हणत शिंदेंनी ठाकरेंना लक्ष्य केले.