Mumbai Pune Corona Update : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना नियंत्रणात असल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईत कोरोनाचा आकडा काही दिवसांपासून रोजचा हजाराच्या आता येत असल्याचं चित्र आहे. मुंबईत गेल्या 24 तासात 575 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 851 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत  6,97,991 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 96 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात 21 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 8,297 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 752 दिवसांवर गेला आहे. 


Mumbai Local : कोविड लसींचे दोन्ही डोस पूर्ण झालेल्यांना लोकल प्रवासाची मागणी, काय आहेत यामागची गणितं?


बृहन्मुंबई परिसरात 15 जुलैपर्यंत कलम 144 लागू


‘ब्रेक द चेन’ अंतर्गत कोविड संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या उपाययोजनांची कडक अंमलबजावणी व्हावी यासाठी बृहन्मुंबई परिसरात 15 जुलैपर्यंत कलम 144 लागू करण्यात आलं आहे. फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 144 नुसार बृहन्मुंबई पोलीस उपआयुक्त (अभियान) यांनी हा आदेश जारी केला आहे. आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध भारतीय दंड विधान, 1860 च्या कलम 188 नुसार कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.


कोविड लसींचे दोन्ही डोस पूर्ण झालेल्यांना लोकलने प्रवास करु देण्याची मागणी 
कोविड लसींचे दोन्ही डोस पूर्ण झालेल्यांना लोकलने प्रवास करु देण्याची मागणी रेल्वे प्रवासी संघटनांकडून करण्यात आलीय.. कोविडचे सर्व नियम (मास्क वगैरे) पाळून लसीकरण पूर्ण झालेल्यांना लोकलने प्रवास करु देण्यास काहीच हरकत नाही, पण कोविड सुसंगत अनुपालनात सुरक्षित अंतर हा एक महत्वाचा मुद्दा आहे, तो मुंबईच्या गर्दीत तर शक्य होणार नाही.. हे ही तितकंच खरं. सध्या मुंबई महानगर प्रदेशात फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकल प्रवासाची परवानगी आहे, त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा राबवण्यात आली आहे. गेल्यावर्षीच्या अनलॉक काळात टप्प्याटप्प्याने मुंबईकरांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली होती. यावर्षी अजून त्याबाबत निर्णय झालेला नाही. लॉकडाऊन काळात जेव्हा फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकल सेवेची परवानगी होती, तेव्हा अनेकांनी बनावट पास किंवा ओळखपत्रे बनवून प्रवास केला, त्यांना रेल्वे पोलिसांनी पकडून दंड केल्याच्या बातम्याही प्रकाशित झाल्या. गेल्या आठवड्यात असाच प्रवास केल्यावर पकडलेल्या कल्याणच्या एका तरुणाचा एक व्हिडीओही व्हायरल झाल्याने चर्चेचा विषय झाला होता. मुंबईत लोकलचा प्रवास कामावर जाणाऱ्यांसाठी अनिवार्य आहे. लोकलशिवाय अन्य कोणतंही प्रवासाचं साधन आर्थिक तसंच वेळेच्या दृष्टीने परवडणारं नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळेच कोरोना प्रतिबंधक लसींचे दोन्ही डोस घेतलेल्यांना आणि अत्यावश्यक सेवेत नसलेल्यांना लोकल प्रवासाची अनुमती द्यावी अशी मागणी पुढे आलीय.  


पुणे शहरात आज नव्याने 344 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद


पुणे शहरात आज नव्याने 344 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता 4 लाख 79 हजार 416 इतकी झाली आहे.शहरातील 283 कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या 4 लाख 68 हजार 008 झाली आहे. पुणे महापालिका हद्दीत नव्याने 7 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या 8 हजार 606 इतकी झाली आहे. पुणे शहरात आज एकाच दिवसात 6 हजार 731 नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता 26 लाख 87 हजार 874 इतकी झाली आहे.पुणे शहरात उपचार घेणाऱ्या 2 हजार 802 रुग्णांपैकी 291 रुग्ण गंभीर तर 432 रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत.