Maharashtra Monsoon Session: महाराष्ट्र विधिमंडळाचं दोन दिवसांचं पावसाळी अधिवेशन येत्या 5 आणि 6 जुलै रोजी होत आहे. अवघ्या दोन दिवसाचं हे पावसाळी अधिवेशन वादळीच ठरण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक दिवसांत राज्य सरकार विरुद्ध विरोधी पक्षात चांगलीच जुंपली आहे. त्यामुळं विविध मुद्द्यांवर पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आमनेसामने येणार आहेत. 


राज्यात आता कोरोना दुसरी लाट हळूहळू कमी होऊ लागली आहे. मात्र तरी देखील राज्यावरील संकट मात्र काही कमी झालेले नाही. आता तर राज्यात डेल्टा प्लसचे रुग्ण देखील आढळून आले असून, एका रुग्णांचा यामुळे मृत्यू देखील झाला. हा धोका ओळखून ठाकरे सरकारने पावसाळी अधिवेशन देखील दोन दिवसांचे घेण्याचा निर्णय घेतला आहे. याचमुळे आता राज्यातील वातवरण तापले असून, दोन दिवसाच्या अधिवेशनातून नेमकं काय साध्य होणार असा प्रश्न मात्र या निमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे.


मागील वर्षभरापासून कोरोना संकटामुळे पावसाळी अधिवेशन, हिवाळी अधिवेशन आणि मार्च महिन्यात झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी ठाकरे सरकारने कमी केला. मात्र आता पावसाळी अधिवेशन देखील पूर्ण आठवडे चालवावे अशी मागणी विरोधकांची असताना ठाकरे सरकारने पावसाळी अधिवेशन देखील 5 आणि 6 जुलै असे दोनच दिवसाचा निर्णय घेतला आहे. मात्र आता यावरुन विरोधक आक्रमक झाले असून, दोन दिवसाचे अधिवेशन देखील वादळी ठरणार आहे. 


या अधिवेशनातले प्रमुख मुद्दे


विधानसभा अध्यक्षपदाची निवड


मंत्र्यांवरचे गंभीर आरोप


कोरोनाकाळातली परिस्थिती


मराठा, ओबीसी आरक्षण 


केंद्रातला राज्य सरकारवरचा दबाव 


राज्यापल नियुक्त 12 नावं 


अशा विविध मुद्द्यांवर राज्य सराकर आणि विरोधी पक्षांमध्ये खटके उडणार आहेत  महाविकासआघाडी सरकारला जनतेच्या प्रश्नांपासून पळ काढयचा आहे. त्यामुळे कोरोनाचे  कारण देत त्यांनी दोन दिवसाच्या अधिवेशनाचा घाट घालण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. एकीकडे हजारोंची गर्दी करुन कार्यालयांचे उद्घाटन करायचे, बारमध्ये गर्दी करायची आणि दुसरीकडे कोरोनामुळे अधिवेशन नको. कोरोनाचे कारण देत अधिवेशन न घेण्याचा हा प्रयत्न आहे जो की आम्हाला मान्य नाही. त्यामुळे आम्ही सभात्याग करतो आहोत” असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. मात्र सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना न जुमानत थेट दोन दिवसाचे अधिवेशन जाहीर करून टाकले. 


शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी टाकलेल्या लेटर बॉम्बमुळे आमदारांची नाराजी देखील समोर आली आहे. त्यामुळे जर विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेतली, तर त्याचा दगाफटका सरकारला बसण्याची दाट शक्यता होती. एवढेच नाही तर विधानसभा अध्यक्षपदावर राष्ट्रवादी काँग्रेसचा देखील डोळा असून, काँग्रेस अध्यक्षपदावरील दावा सोडायला तयार नाही. त्याचमुळे एकीकडे अशा पद्धतीचे वातावरण असताना, अध्यक्षपदाची निवडणूक न घेता अध्यक्षांविनाच दोन दिवसांचे कामकाज संपवण्याचा इरादा मुख्यमंत्र्यांचा आहे.  


दुसरीकडे सचिन वाझे प्रकरणात अनिल देशमुखांना राजीनामा घेण्यात आला होता त्यानंतर अनिल परब आणि मिलिंद नार्वेकरांचं नवं प्रकरण समोर येतंय त्यामुळे या ना त्या आरोपांवरून विरोधी पक्षांत आणि सत्ताधाऱ्यांमध्ये दोन दिवसात चांगलीच जुंपणार आहे 


आमदारांच्या कोरोना चाचणीवरती विधानसभा अध्यक्षांची निवडणूक अवलंबून
आमदारांच्या कोरोना चाचणीवरती विधानसभा अध्यक्षांची निवडणूक अवलंबून असणार आहे.  सर्व आमदारांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली तर विधानसभा अध्यक्षाची निवडणूक येत्या अधिवेशनात होणार आहे.  महाविकास आघाडीतील तीनही पक्षांच्या आमदारांची कोरोना चाचणी अहवाल जमा करायला सुरुवात केली आहे.  आत्तापर्यंत 42 आमदारांची टेस्ट निगेटिव्ह आलेली आहे.  त्यात एकही आमदार कोरोना पॉझिटिव्ह आलेला नाही.   त्यामुळे उद्या दुपार पर्यंत सर्व आढावा घेऊन विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घ्यायची की नाही यावर निर्णय होणार आहे.