मुंबई: कोविड लसींचे दोन्ही डोस पूर्ण झालेल्यांना लोकलने प्रवास करु देण्याची मागणी रेल्वे प्रवासी संघटनांकडून करण्यात आलीय.. कोविडचे सर्व नियम (मास्क वगैरे) पाळून लसीकरण पूर्ण झालेल्यांना लोकलने प्रवास करु देण्यास काहीच हरकत नाही, पण कोविड सुसंगत अनुपालनात सुरक्षित अंतर हा एक महत्वाचा मुद्दा आहे, तो मुंबईच्या गर्दीत तर शक्य होणार नाही.. हे ही तितकंच खरं.. 


सध्या मुंबई महानगर प्रदेशात फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकल प्रवासाची परवानगी आहे, त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा राबवण्यात आली आहे. गेल्यावर्षीच्या अनलॉक काळात टप्प्याटप्प्याने मुंबईकरांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली होती. यावर्षी अजून त्याबाबत निर्णय झालेला नाही. लॉकडाऊन काळात जेव्हा फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकल सेवेची परवानगी होती, तेव्हा अनेकांनी बनावट पास किंवा ओळखपत्रे बनवून प्रवास केला, त्यांना रेल्वे पोलिसांनी पकडून दंड केल्याच्या बातम्याही प्रकाशित झाल्या. गेल्या आठवड्यात असाच प्रवास केल्यावर पकडलेल्या कल्याणच्या एका तरुणाचा एक व्हिडिओही व्हायरल झाल्याने चर्चेचा विषय झाला होता. 


आम्ही सरकारी कर्मचारी नाही, म्हणजे गुन्हेगार का? लोकलने विनापरवानगी प्रवास करताना पकडलेल्या 'त्या' तरुणाचा उद्विग्न सवाल


मुंबईत लोकलचा प्रवास कामावर जाणाऱ्यांसाठी अनिवार्य आहे. लोकलशिवाय अन्य कोणतंही प्रवासाचं साधन आर्थिक तसंच वेळेच्या दृष्टीने परवडणारं नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळेच कोरोना प्रतिबंधक लसींचे दोन्ही डोस घेतलेल्यांना आणि अत्यावश्यक सेवेत नसलेल्यांना लोकल प्रवासाची अनुमती द्यावी अशी मागणी पुढे आलीय.  


कोविड लसीकरणाचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यताही नगण्य असली तरी असतेच.. कारण मुंबईतील लोकल प्रवासाच्या गर्दीत सुरक्षित शारिरीक अंतर पाळणं कुणालाच शक्य होणार नाही. कारण गर्दी वाढली की कोरोनाचा संसर्ग वाढणार हे सांगायला कुणा ज्योतिषाची आवश्यकता नाही. अशा वेळी लसीकरण हे एकमेव सिद्ध झालेलं शस्त्र आपल्याकडे आहे. त्यातही काही त्रुटी असल्या तरी आपल्याला सध्या तरी लसीकरणाचा निकष हा महत्वाचा मानायलाच हवा. 


Mumbai Local : लसीकरण पूर्ण झालेल्यांना लोकलनं प्रवास करु द्या, प्रवासी संघटनेचं सरकारकडे साकडं


आज सकाळी जारी झालेल्या, कालपर्यंतच्या (2 जुलै) च्या आकडेवारीनुसार राज्यात तीन कोटी 31 लाख 10 हजार 659 जणाचं लसीकरण झालेलं आहे. त्यातील दोन कोटी 65 लाख  12 हजार जणांचा पहिला डोस तर 65 लाख 97 हजार जणांचा दुसरा डोस पूर्ण झालेला आहे. म्हणजेच कोविड प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची किंवा लसीकरण पूर्ण झालेल्यांची संख्या ही 65 लाखांपेक्षा जास्त आहे. 


मुंबईची आकडेवारी पाहायची तर, मुंबई शहर आणि उपनगर अशा दोन जिल्ह्यांचा समावेश असलेल्या या  महानगरात 57,05,868 जणाचं लसीकरण झालेलं आहे.. त्यातील सुमारे 11 लाख 40 हजार जणाचे दोन्ही डोस पूर्ण झालेले आहेत म्हणजेच त्याचं लसीकरण पूर्ण झालेलं आहे. 


मुंबईला जोडून असलेल्या मुंबई महानगर प्रदेशातील ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यातील लसीकरणाचीही आकडेवारी विचारात घ्यायला हवी.. कारण मुंबई लोकलच्या रोजच्या वाहतुकीचं क्षेत्र हे मुंबई महानगर प्रदेशातही मोठ्या प्रमाणावर आहे. मुंबईत दररोज कामासाठी येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या प्रामुख्याने या तीन जिल्ह्यातूनच आहे. रायगड जिल्ह्यात पनवेल ही महापालिका आहे तर ठाणे आणि पालघर जिल्ह्यात तब्बल सात महापालिका आहेत. त्यातील सहा ठाणे जिल्ह्यात तर वसई विरार ही पालघर जिल्ह्यात आहे. ठाणे जिल्ह्यात ठाणे शहर, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, भिवंडी - निजामपूर, उल्हासनगर आणि मिरा भायंदर या महापालिका आहेत.     


वृद्धाश्रमातील आजी-आजोबांचा आधार हरपणार? लोकल प्रवेशबंदीमुळे वृद्धाश्रम सेवक अडचणीत


ठाणे जिल्ह्यात 2 जुलैच्या आकडेवारीनुसार 26 लाख जणाचं एकूण लसीकरण झालेलं आहे, त्यातील दुसरा डोस घेतलेल्यांची म्हणजे कोविड लसीकरण पूर्ण झालेल्यांची संख्या चार लाख 98 हजार 398 एवढी आहे. अर्थातच या आकडेवारीत ठाणे जिल्ह्यातील सहा महापालिकासंह ग्रामीण भागाचाही समावेश आहे, मात्र तेथील प्रवासाही मुंबईत कामानिमित्त लोकल प्रवास करतात. 


ठाणे जिल्ह्याचंच विभाजन करुन बनवण्यात आलेल्या पालघर जिल्ह्यात 2 जुलै अखेर पाच लाख 55 हजार जणाचं लसीकरण पूर्ण झालेलं आहे. त्यापैकी दोन्ही डोस झालेल्यांची म्हणजे कोविड लसीकरण पूर्ण झालेल्यांची संख्या 98184 एवढी आहे. 


मुंबईला संलग्न असलेला मुंबई महानगर प्रदेशातील तिसरा जिल्हा म्हणजे रायगड. रायगड जिल्ह्यात 2 जुलै अखेर सहा लाख 70 हजार 578 जणाचं लसीकरण झालेलं आहे, त्यापैकी एक लाख आठ हजार जणांचा (108714) लसीचा दुसरा डोसही पूर्ण झालेला आहे.  


Mumbai Local Train : लोकलमधील अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी क्यूआर कोड लागू करण्याचा राज्य सरकारचा विचार 


म्हणजेच मुंबई महानगर प्रदेशातील म्हणजे मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातील 95 लाख 31 हजार 724 एकूण लसीकरणांपैकी 18 लाखांपेक्षा जास्त जणांनी कोविड लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. तसंच सध्या मुंबईत असलेल्या पण लॉकडाऊन काळात गावाकडे गेलेल्या अनेकांनी आपल्या गावाकडे लस घेतलेल्यांची संख्याही मोठी असू शकते, मात्र त्यांची नेमकी आकडेवारी आता उपलब्ध नाही. 


मुंबई महानगर प्रदेशातील लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या सुमारे 18 लाख लोकांपैकी सर्वच्या सर्व लोकलचे नियमित प्रवासी असतीलच असंही नाही. त्यातील अनेकांनी कधीच लोकलने प्रवास केलेला नसेल किंवा यापुढेही करणार नसण्याची शक्यता आहे. 


कोविड लसीकरणाचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यताही नगण्य असली तरी असतेच.. कारण मुंबईतील लोकल प्रवासाच्या गर्दीत सुरक्षित शारिरीक अंतर पाळणं कुणालाच शक्य होणार नाही. त्यामुळे राज्य सरकार लसीकरण झालेल्यांना लोकल प्रवासाची अनुमती देणार का? हा प्रश्न आहेच.. पण सरकारने पूर्ण कोविड लसीकरण म्हणजेच लसीचे दोन्ही डोस झालेल्यांना लोकल प्रवासाची परवानगी हा निर्णय घेतला तर 2 जुलैच्या आकडेवारीनुसार 18 लाखांपैकी किमान 8 लाख जणांना जरी लोकल प्रवास करता आला तर त्याचं दररोजचं जगणं सुसह्य होणार आहे.