मुंबई: मुंबईत पावसाळ्यात हवेची गुणवत्ता (Mumbai Air Pollution) चांगल्या श्रेणीत होती. मान्सून (Monsoon Withdrawl) परतल्यानंतर वाऱ्यांचा वेग मंदावला असून मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावली आहे. त्यामुळे वाढत्या ऑक्टोबर हिटसोबत (October Heat) मुंबईकरांना आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे.
देशातल्या काही महत्वांच्या शहरांच्या हवेच्या गुणवत्तेसंदर्भात 2019 ते 2023 अशी चार वर्ष अभ्यास करण्यात आला. ज्यामध्ये ऑक्टोबर ते मार्च या महिन्यांच्या दरम्यान हवेची गुणवत्ता खालावत असल्याचं दिसून आलंय. दिल्ली, बंगळुरू, कोलकाता, लखनऊ, पाटणा, मुंबई अशा मोठा शहरांमध्ये प्रदुषण वाढून हवा दूषीत होत असल्याचं जाणवलं आहे. मुंबईत पावसाळ्यात धूळ कमी प्रमाणात उडते त्यामुळे हवा बऱ्यापैकी चांगली असते. पण ऑक्टोबरनंतर मुंबईतल्या हवेची गुणवत्ता मॉडरेट श्रेणीत दिसत आहे. दिल्ली आणि पाटण्यातही हवेची गुणवत्ता मोठ्या प्रमाणावर घसरल्याचं दिसून आलंय.
धुलीकणांचं प्रमाण अतिधोकादायक पातळीवर
सफर या संस्थेच्या नोंदींनुसार शहरातील हवेचा दर्जा काही दिवसांपासून वाईट श्रेणीत नोंदला जात आहे. वातावरणातील घातक धूलीकणांचे प्रमाण वाढले आहे. पार्ल्यात सोमवारी संध्याकाळी अतिधोकादायक हवेची नोंद झाली असून हवा गुणवत्ता निर्देशांक 318 नोंदवला गेला. या हवेत घराबाहेर पडणंही धोकादायक ठरू शकतं. या शिवाय माझगाव, कुलाबा, अंधेरी, मालाड, परळ, मुलुंड या परिसरातील हवा अतिवाईट श्रेणीत असल्याची नोंद झाली. मुंबई शहरात धुलीकणांच्या प्रमाणाने अतिधोकादायक पातळी ओलांडली आहे. सतत वाढत असलेल्या प्रदुषणामुळे मुंबईतील हवेचा दर्जा खालावला आहे. दोन्ही बाजूंनी समान वारे वाहत असल्याने मुंबई आणि नवी मुंबईला प्रदुषणाचा विळखा बसलेला आहे. वाढत्या विकासकामांमुळे हवेत धूळ उडण्याचं प्रमाणही वाढलेलं आहे.
अशा प्रकारे स्वतःचे रक्षण करा.
- व्यायाम करा.
- सकाळी घराबाहेर पडू नका.
- जर तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
- रोज सकाळी योगा करा.
- जास्त प्रदूषण असेल तर मास्क लावूनच बाहेर पडा
काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन
हवेची गुणवत्ता खालावल्यामुळे मुंबई आणि परिसरातील लोकांना श्वसनाचे विकार होण्याची शक्यता आहे, त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाने केलेलं असून, हे प्रदूषण रोखण्याचं आव्हानही समोर उभं ठाकलंय.
हे ही वाचा :
Health Tips : गरोदर असून मोकळ्या हवेत फिरत आहात, तर थांबा, वायू प्रदूषणाचा धोका वाढतोय