मुंबई : शिवसेनेत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्यानंतर आता शिवसेना शिंदे गटाचा (Shiv Sena Shinde Faction) यंदा दुसरा दसरा मेळावा (Dasara Melava) होणार आहे. निवडणूक आयोगाने मूळ शिवसेना नाव आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिल्यानंतरचा पहिलाच दसरा मेळावा असणार आहे. या दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाने आपली रणनीती आखली असून सभेसाठी प्रत्येक जिल्हाप्रमुखाला गर्दीसाठी लक्ष्य देण्यात आले आहे. शिंदे गटाकडून मुंबईतील आझाद मैदानावर मेळावा घेण्यात येणार आहे.
दसरा मेळावा (Dasara Melava) आझाद मैदानावर (Azad Maidan) घेण्याचा निर्णय शिंदे गटाकडून (Shinde Group) घेण्यात आला आहे. त्यामुळे आता शिंदे गटाचा मेळावा हा आझाद मैदानावर घेण्यात येणार आहे. शिंदे गटाकडून क्रॉस मैदान आणि आझाद मैदान ही दोन मैदानं ठरवण्यात आली होती. पण हा मेळावा आता आझाद मैदानावर घेण्याचं निश्चित करण्यात आलं आहे. क्राॅस मैदान यावरती क्रिकेटच्या मैदानांचे पिच आणि मैदानांवर नियोजन करण्यात अडचणी येत असल्याने आझाद मैदानवर शिंदे गटाचा दसरा मेळावा घेतला जाणार आहे. दरम्यान पोलिसांनी देखील या मैदानावर दसरा मेळावा घेण्याची परवानगी शिंदे गटाला दिली आहे.
दसरा मेळाव्यासाठीची तयारी सुरू
शिंदे गटाच्यावतीने दसरा मेळाव्याच्या तयारीसाठी बैठकांचा धडाका लावला आहे. काही दिवसांपूर्वी वर्षावर बैठक झाली होती. त्यानंतर आज, ठाण्यातील टिपटॉप प्लाझा येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मार्गदर्शन केले.
सभेसाठी गर्दीचे लक्ष्य
शिंदे गटाकडून दसरा मेळाव्यासाठी विविध पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपवली आहे. त्यानंतर आता सभेसाठी गर्दी जमवण्याचे आव्हान शिंदे गटासमोर आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभेसाठी प्रत्येक जिल्हा प्रमुखाने किमान 5000 कार्यकर्ते, नागरिकांना सभेसाठी आणण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे शिंदे गटाकडून यंदाच्या दसरा मेळाव्यासाठी किमान पावणे दोन लाख ते दोन लाख गर्दी जमवण्यावर भर असणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
शिवाजी पार्कात ठाकरेंचा आवाज घुमणार
दरम्यान दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षात देखील ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कात होणार आहे. त्यामुळे यंदा देखील शिवाजी पार्क मैदानात ठाकरेंचाच आवाज घुमणार आहे. मागील वर्षी देखील मैदानावरुन वाद निर्माण झाला होता. पण त्यावेळी देखील ठाकरेंनाच दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्काचं मैदान मिळालं होतं. तर शिंदेंच्या शिवसेनेने बीकेसीच्या मैदानावर दसरा मेळावा घेतला होता. पण यंदा बीकेसीच्या मैदानावर अनेक कामं सुरु असल्याचे शिंदेंना दसरा मेळावा तिथे घेणं शक्य नव्हतं.