Mumbai Police on New Year Celebration : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नव्या वर्षाचे (New Year Celebration) उत्साहात स्वागत करण्यासाठी मुंबईतील विविध ठिकाणांसह गेट वे ऑफ इंडियासह इतर समुद्र किनारी मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. सेलिब्रेशन मूडला गालबोट लागू नये यासाठी मुंबई पोलीस अलर्ट मोडवर आहे. मुंबई पोलिसांकडून ठिकठिकाणी बंदोबस्तात वाढ केली आहे. पोलिसांनी समुद्रकिनारी देखील सुरक्षा वाढवली आहे. नवीन वर्ष संपूर्ण शहरात शांततेत साजरे व्हावे यासाठी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) संपूर्ण मुंबईतील समुद्रकिनारी सुरक्षा वाढवली आहे. मुंबई पोलिसांनी 18 बोटी सागरी सीमेवर तैनात केल्या आहेत. 18 बोटींपैकी 16 बोटी महत्त्वाच्या ठिकाणी तर 2 बोटी स्टँडबाय ठेवण्यात आल्या आहेत.
या बोटींवर प्रत्येकी 1 पोलीस अधिकारी आणि 4 पोलीस हवालदार शस्त्रांसह असतील. 31 डिसेंबरच्या सकाळपासून 1 जानेवारीच्या सकाळपर्यंत 24 तास तैनात पोलीस बंदोबस्त असणार आहे.
या ठिकाणी असणार नौका तैनात...
गेटवे ऑफ इंडिया- ताज हॉटेल, मरीन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटी, वरळी सीफेस, वांद्रे ताज लँड, जुहू चौपाटी, अक्सा बीच, ट्रॉम्बे माहुल जेट्टी, भाऊचा धक्का आदी महत्त्वाच्या ठिकाणांवर नौका तैनात करण्यात आल्या आहेत. सेलिब्रेशनसाठी लोकांनी समुद्रात जाऊ नये यासाठीही पोलीस लक्ष देणार आहेत. कोणतीही अनुचित घटना घडू नये, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठीदेखील पोलीस काळजी घेणार आहेत.
पोलिसांचे 'ऑपरेशन ऑल आऊट'; नाकाबंदी, कॉम्बिंग ऑपरेशन
नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनला गालबोट लागू नये यासाठी मुंबईत पोलिसांकडून ठिकठिकाणी नाकाबंदी, बंदोबस्त करण्यात आला आहे. वाहतुकीचे नियम न पाळणार, हेल्मेटचा वापर न करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई सुरू आहे. त्याशिवाय, पोलिसांनी ऑपरेशन ऑल आउट राबवले. पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये काही जणांना ताब्यात घेतले आहे. अजामिनपत्र वॉरंटची अंमलबजावणी करून 77 जणांना अटक करण्यात आली आहे. बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगणाऱ्या 49 कारवाया करण्यात आलेल्या असून त्यात चाकू तलवारी शस्त्रे जप्त करण्यात आलेले आहेत.
दारू जुगार आदी अवैधपणे व्यवसाय सुरू असलेल्या एकूण 95 ठिकाणी छापे टाकून 63 आरोपी त्यांना अटक करण्यात आली आहे. मुंबई शहराबाहेर तडीपार केलेल्या परंतु मुंबई शहरात विनापरवाना प्रवेश केलेला 50 तडीपार आरोपींना अटक करण्यात आली आहे.
या कॉम्बिंग ऑपरेशनसाठी 212 ठिकाणी नाकेबंदी करण्यात आली होती. तर, एकूण 7964 वाहनांची तपासणी करण्यात आली.
वाहतूक व्यवस्थेत बदल
नव वर्षाच्या स्वागतासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. अशातच नववर्षाच्या निमित्तानं सर्व काही सुरळीत होण्यासाठी प्रशासनंही पुर्ण तयारीत आहे. नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला वाहतूक कोंडी (Traffic Congestion) आणि गर्दी (Crowd) टाळण्यासाठी मुंबई पोलिसांनी आणि वाहतूक पोलिसांनी मुंबईतील गिरगाव, जुहू चौपाटी, गेटवे ऑफ इंडिया या परिसरामध्ये वाहतुकीत आणि पार्किंगच्या व्यवस्थेत काही बदल केलेले आहेत.