Mumbai Police News : सध्या सगळीकडे नवीन वर्षाच्या स्वागताचा ( New Year Celebretion) माहोल आहे. ईअर एन्डच्या पार्टाची (Year End)  जोरदार तयारी सगळीकडे होत आहे. अशात पार्ट्यांमध्ये ड्रग्जसारखे अमली पदार्थ वापरणाऱ्यांवर मुंबई पोलिसांचं (Mumbai Police) विशेष लक्ष असणार आहे. त्यामुळं मुंबईतील कोणत्याही रेव्ह पार्टी किंवा पार्ट्यांमध्ये सहभागी होण्याचा आणि ड्रग्ज घेऊन नवीन वर्ष साजरा करण्याचा विचार करत असाल तर सावध रहा.  कारण मुंबई पोलिस साध्या वेशात या पार्ट्यांवर नजर ठेवणार असून जर कोणीही गैरकृत्य करताना किंवा दोषी आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे.


जवळजवळ दोन वर्षाच्या लॉकडाऊन काळात टाकण्यात आलेले निर्बंध हटवल्यानंतर आता लोकांना रात्रभर पार्टी करण्याची परवानगी भेटली आहे. पण कुठलाही कायदा व सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मुंबई पोलिसही सतर्क झाले असून त्यांनी संपूर्ण मुंबईत मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.


सुशांत सिंहच्या (Sushant Singh Rajput) आत्महत्येच्या प्रकरणानंतर ड्रग्ज सेवन आणि विक्रीचा मुद्दा चर्चेत आला होता.  मुंबई पोलिसांसह केंद्र तसेच राज्य पोलिसांनी अंमली पदार्थ विकणारे आणि अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांवर कारवाई सुरू केली. मुंबई पोलिसांचे मुख्य लक्ष मुंबई आणि इतर भागात ड्रग्सचे सेवन आणि पुरवठा रोखण्याचे होते. ज्यात मुंबई पोलिसांनी जवळपास पाच हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केलं आहे. 
 
2022 मध्ये 4928 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त 


मुंबई पोलिसांनी स्वतः 2022 मध्ये 4928 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहे.  2022 मध्ये नोव्हेंबरपर्यंत मुंबई पोलिसांच्या अँटी नार्कोटिक सेलने 708 गुन्हे नोंदवले आणि 4928.66 कोटी रुपयांचे 4036 किलो ड्रग्ज जप्त करून 844 जणांना अटक केली. 2021 मध्ये सुमारे 594 प्रकरणे नोंदवण्यात आली होती आणि 151 कोटी रुपयांचे 4050 किलो ड्रग्ज जप्त करून 776 लोकांना अटक करण्यात आली.


2020 मध्ये 480 लोकांना अटक करण्यासाठी आणि 28 कोटी रुपयांचे 1023 किलो ड्रग्ज जप्त करून सुमारे 414 प्रकरणे नोंदवण्यात आली. त्याचप्रमाणे 2019 मध्ये सुमारे 595 लोकांना अटक करून सुमारे 514 गुन्हे दाखल करण्यात आले आणि 67 कोटी रुपयांचे सुमारे 716 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले.
 
आता नवीन वर्षाच्या स्वागताच्या निमित्तानं होणाऱ्या पार्ट्यांच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहरभर प्रत्येक प्रमुख जंक्शनवर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.  तसेच मद्यप्राशन करून वाहन चालवताना कोणताही वाहनचालक आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. 


ही बातमी देखील वाचा


BMC: मुंबई महापालिकेतील पक्ष कार्यालयावरुन ठाकरे आणि शिंदे गट आमनेसामने, तूर्तास कार्यालयाची किल्ली पेचात पडलेल्या प्रशासनाकडे