मुंबई : शिवसेना पक्ष कार्यालयावरून शिंदे गट आणि ठाकरे गटातील संघर्ष पुन्हा पेटला आहे. मुंबई महापालिकेच्या (BMC) शिवसेना पक्ष कार्यालयावर शिंदे गटाच्या माजी नगरसेवकांनी दावा केला. यावरुनच काल शिंदे गट आणि ठाकरे गटात राडा झाल्याचं पहायला मिळालं. दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात घोषणाबाजी करत गोंधळ घातला. दरम्यान आज ठाकरे गटाचे माजी नगरसेवक कार्यालयाचा ताबा घेणार असून मुंबई महापालिका आयुक्तांची देखील भेट घेण्याची शक्यता आहे.  दरम्यान सध्या महापालिकेत कोणत्याच पक्षाचा नगरसेवक नसल्याने इथे कोणालाच बसून देऊ नये अशी मागणी आयुक्तांकडे करणार असल्याचं आमदार सुनील शिंदेंनी सांगितलं आहे. 


काय घडलं मुंबई पालिकेत?


मुंबई महापालिकेत दुपारी 4 वाजता शिंदे गटाच्या नेत्यांची एक टीम पालिकेत धडकली. त्यात खासदार राहुल शेवळे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव, शीतल म्हात्रे, ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के अनेक जण होते. पालिकेत पोहचल्यानंतर त्यांनी सर्वात आधी शिवसेनेचं पक्षकार्यालय गाठलं.  तिथं दाराजवळ असलेल्या बोर्डावर काही तरी छेडाछाड केली. त्यानंतर सगळे जण सभागृहात पोहोचले. शिवसेनेच्या पक्ष कार्यालयात दाखल होईल छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घातला आणि घोषणाही दिल्या  स्वच्छता केल्याचा दावा करत शिंदे गटातील नेत्यांनी बैठक सुरु केली 


शिंदे गटाच्या हालचालींची माहिती मिळाताच  पुढच्या काही मिनिटांत मोठा ट्विस्ट आला. उद्धव ठाकरे गटातील माजी आमदारांसह शिवसैनिकांची मोठी फौजच तिथं पोहोचली आणि घोषणाबाजीला सुरुवात झाली. कार्यलयाच्या हॉलमध्ये दोन्ही गट एकमेकांसमोर आले. दोन्ही बाजूनं जोरदार घोषणाबाजी सुरु झाली. तणाव वाढू लागला. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात घोषणाबाजी सुरु केली. त्यामुळं त्यांना आवर घालताना मुंबई पोलिसांची मोठी पंचाईत झाली होती. अखेर बीएमसीच्या सुरक्षारक्षकांना सोबत घेऊन मुंबई पोलिसांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना पालिकेच्या इमारतीबाहेर काढलं. 


दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये तणाव वाढवला. पोलिसांनी आणखी कुमूक मागवली. काही मिनिटांमध्ये पालिकेला छावणीचं स्वरुप आलं. तणाव सुरु होऊन एक तास झाला होता. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता ओळखून पोलिसांनी दोन्ही गटांच्या नेत्यांना कार्यलायतून बाहेर काढलं. त्यानंतर  दोन्ही गट पालिकेसमोर जमले. तर तिकडे शिंदे गटांनं ते कार्यालय आमचंच असल्याचा दावा केला. 


शिवसेनेतल्या ऐतिहासिक बंडाच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि नागपूरच्या विधान भवनात ठाकरे आणि शिंदे गटात पक्ष कार्यालयासाठी राजकीय संघर्ष झाल्याचं पाहायला मिळालयं. नवी दिल्लीतल्या संसदेतही दोन्ही गटांच्या खासदारांमध्ये पक्ष कार्यालयासाठी संघर्ष सुरु आहे. आता शिंदे गटानं मुंबई महापालिकेतल्या पक्ष कार्यालयावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.