मुंबई: मुंबई महापालिकेतील (Mumbai Muncipal Corporation) सर्वच पक्षांची कार्यालयं सील (Office Seal) करण्यात आली आहे. शिंदे गट-ठाकरे गटाच्या राड्यानंतर महापालिका आयुक्तांनी निर्णय केला आहे. आयुक्तांच्या पुढील आदेशापर्यंत सर्वच पक्षांची कार्यालयं तात्पुरती सील करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेतील (BMC) फक्त सर्व पक्ष कार्यालयच नाही तर विविध समितीच्या अध्यक्षांची दालनं सुद्धा सील करण्यात आली आहेत.
सर्व पक्षांची कार्यालय नाही तर सर्व समितीच्या अध्यक्षांची दालनं सुद्धा आयुक्तांच्या आदेशाने सील करण्यात आली. पक्ष कार्यालय सील झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेवक आक्रमक झाले आणि त्यांनी थेट मुंबई महापालिकांचे आयुक्त दालन गाठलं. मात्र आयुक्तांनी लवकर वेळ न दिल्याने आयुक्तांच्या दालनबाहेर ठिय्या मांडला. मग खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वात माजी ठाकरे गटांच्या नगरसेवकांचे शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेऊन निवेदन दिलं आणि पक्ष कार्यालय सुरू करण्याची मागणी केली. शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाच्या मुंबई महापालिकेच्या नव्या रणांगणात मुंबई महापालिकेचे प्रशासक म्हणून काम पाहणारे आयुक्त इकबाल सिंह चहल शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाच्या गोंधळानंतर सर्वच पक्षांची पक्ष कार्यालय बंद ठेवतात की आपला घेतलेला निर्णय बदलून सुरू करतात ? ते आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे...
खासदार राहुल शेवाळे, नरेश म्हस्के, यशवंत जाधव, शीतल म्हात्रे आणि गिरीश धानुरकर यांच्यासह शिंदे गटाच्या अनेक कार्यकर्त्यांनी मुंबई महापालिकेत जाऊन शिवसेनेच्या पक्ष कार्यालयावर आपला हक्क सांगितला. ती बातमी कळताच शिवसेनेतल्या ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनीही मुंबई महापालिका गाठली. त्यामुळं शिवसेनेतल्या शिंदे आणि ठाकरे गटातल्या राजकीय संघर्षाचं मुंबई महापालिका हे नवं रणांगण बनले आहे.
शिंदे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांची आधी भेट घेतली. मग त्यांनी शिवसेनेच्या पक्ष कार्यालयात दाखल होईल छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घातला आणि घोषणाही दिल्या. त्यानंतर शिवसेनेच्या पक्ष कार्यालयात दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात घोषणाबाजी सुरु केली. त्यामुळं त्यांना आवर घालताना मुंबई पोलिसांची मोठी पंचाईत झाली होती. अखेर बीएमसीच्या सुरक्षारक्षकांना सोबत घेऊन मुंबई पोलिसांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना पालिकेच्या इमारतीबाहेर काढलं.
शिवसेनेतल्या ऐतिहासिक बंडाच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि नागपूरच्या विधान भवनात ठाकरे आणि शिंदे गटात पक्ष कार्यालयासाठी राजकीय संघर्ष झाल्याचं पाहायला मिळालयं. नवी दिल्लीतल्या संसदेतही दोन्ही गटांच्या खासदारांमध्ये पक्ष कार्यालयासाठी संघर्ष सुरु आहे. आता शिंदे गटानं मुंबई महापालिकेतल्या पक्ष कार्यालयावर ताबा मिळवला आहे.
संबंधित बातम्या :