Parambir Singh : परमबीर सिंहांची गुन्हे शाखेकडून सात तास चौकशी, सर्व आरोप खोटे असल्याचा परमबीरांचा दावा
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची गुन्हे शाखेकडून तब्बल सात तास चौकशी करण्यात आली आहे.
मुंबई : न्यायालयाने फरार घोषित केलेले परमबीर सिंह आज मुंबई पोलिसांपुढे हजर झाले आहेत. त्यांच्यावर असलेल्या वेगवेगळ्या आरोपांवर गुन्हे शाखेने त्यांची तब्बल सात तास चौकशी केली आहे. गुन्हे शाखेची ही चौकशी पूर्ण झाली असून परमबीर सिंहांनी त्यांच्यावर असलेले सर्व आरोप फेटाळल्याची माहिती समोर येत आहे.
न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे मी तपासाला सहकार्य करेन. माझ्यावर करण्यात आलेले सर्व आरोप हे खोटे आहेत. माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे आणि सत्याचा विजय होईल अशी एक्सक्लुझिव्ह माहिती परमबीर सिंहांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितली. परमबीर सिंह यांची गुन्हे शाखेने चौकशी केली असली तरी त्यांच्यावर इतरही काही आरोप ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे त्या प्रकरणांमध्येही परमबीरांना चौकशीला सामोरं जावं लागणार आहे.
न्यायालयाने फरार घोषित केलं होतं.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना फरार घोषित केलं होतं. पाच वेगवेगळ्या खंडणी प्रकरणात आरोपी असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना फरार घोषित करा, असा अर्ज मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने दाखल केला होता. त्यावर मुख्य दंडाधिकारी न्यायालयाने त्यांना फरार घोषित केलं होतं. परमबीर सिंह यांना फरार घोषित केल्यानंतर आता त्यांना 30 दिवसांची मुदत दिली गेली होती. या 30 दिवसांत परमबीर सिंह जर न्यायालयासमोर हजर झाले नाहीत तर त्यांची मालमत्ता सील करण्याचा अधिकार राज्य सरकारला मिळणार होता. पण आता परमबीर सिंह परतल्यामुळं या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे.
दहशतवाद्यांना मदत केल्याचा आरोप
परमबीर सिंग यांनी दहशतवाद्यांना मदत केल्याचा आरोप निवृत्त एसीपी शमशेर पठाण यांनी केलाय. परमबीर यांनी दहशतवादी अजमल कसाबचा मोबाईल कुठेतरी लपवून ठेवला होता, असा आरोपही शमशेर पठाण यांनी केलाय. या प्रकरणांचा तपास करण्याची मागणी शमशेर पठान यांनी केली आहे.
संबंधित बातम्या :
- Parambir Singh at Mumbai : फरार घोषित केलेले परमबीर सिंह अखेर मुंबईत दाखल
- 'परमबीर सिंहांकडून दहशतवाद्यांना मदत, कसाबचा मोबाईल लपवला', निवृत्त एसीपींचा खळबळजनक आरोप, चौकशीची मागणी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha