मुंबई: मरिन ड्राईव्हवर पहाटे 2 वाजता बसलो असता मुंबई पोलिसातील एका कर्मचाऱ्याने आपल्याकडून 2500 रुपयांची लाच मागितली असा दावा एका एका व्यक्तीने केला आहे. ही लाच यूपीआयच्या माध्यमातून घेण्यात आली असून त्याचा एक स्क्रीनशॉट त्या व्यक्तीने शेअर केला आहे. मुंबईत आता हेच व्हायचं बाकी राहिलं आहे असंही त्याने म्हटलंय. त्या व्यक्तीच्या ट्वीटची दखल मुंबई पोलिसांनी घेतली असून त्याच्याकडून अधिकची माहितीही मागवून घेतली आहे. विग्नेश किशन असं या व्यक्तीचं नाव आहे. 


आपण या ठिकाणी रात्री फिरायला गेलो असतो, त्या ठिकाणी बसलो असता पोलिसांनी आपल्याकडे लाच मागितली असा दावा केला आहे. त्यानंतर यूपीआयच्या माध्यमातून 2500 रुपये दिल्याचंही त्याने सांगितलं. त्याने या संबंधित एक स्क्रीनशॉटही शेअर केला आहे. या स्क्रीनशॉटमध्ये 4 मार्च रोजी पहाटे 2.18 ची वेळ दाखवतं. या स्क्रीनशॉटमध्ये ज्या व्यक्तीने हे पैसे दिले आहेत आणि ज्या व्यक्तीला हे पैसे देण्यात आले आहेत, त्यांची नावं आहेत. 


मुंबई पोलिसांचा प्रतिसाद


या व्यक्तीने शेअर केलेल्या ट्वीटला मुंबई पोलिसांनी तात्काळ प्रतिसाद दिला आहे. आपण याचा फॉलोअप घेऊ असं सांगत या व्यक्तीकडून सर्व डिटेल्स मागवण्यात आले आहेत. आता अशा प्रकारची लाच घेणाऱ्या पोलिसावर काय कारवाई केली जाते हे पाहावं लागेल.


 






सोशल मीडियावर वेगवेगळ्या रिअॅक्शन


त्या व्यक्तीने शेअर केलेल्या स्क्रीनशॉटनंतर अनेकांनी यावर रिअॅक्शन दिल्या आहेत. सार्वजनिक ठिकाणी बसल्यावर असा दंड लावणे कितपत योग्य आहे असा सवाल अनेकांनी विचारला आहे. तसेच अशा प्रकारचा अनुभव आपल्यालाही आला असल्याचं काहींनी म्हटलं आहे. 


अशा प्रकारचा दंड मागितल्यानंतर किंवा दंडाची रक्कम भरल्यानंतर त्या व्यक्तीने संबंधित पोलिसाकडून रिसिटची मागणी का केली नाही असा सवाल काही यूजर्सनी विचारला आहे. 


मरिन ड्राईव्हवर फिरण्यासाठी काय आहेत नियम? 


मरिन ड्राईव्हवर फिरण्यासाठी रोज लाखो लोक येतात. या ठिकाणी दिवसभर फिरण्यासाठी तसे काही नियंत्रणं नाहीत. पण रात्री 1 वाजल्यानंतर पहाटेपर्यंत या ठिकाणी जाण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. रात्री या ठिकाणी काही अप्रिय घटना घडू नयेत यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून ही गोष्ट केली जाते. यावेळी पोलिस गस्तही घालत असतात, आणि जर कोणी या ठिकाणी आले असतील तर त्यांना हटकले जाते. 


ही बातमी वाचा: