Coastal Road : मुंबईच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असलेला कोस्टल रोड येत्या 1 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. येत्या 15 मार्चला दोन्ही टनेलचं उद्घाटन होणार आहे. या प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर असून दक्षिण कोस्टल रोड प्रकल्पाचे काम 70 टक्के पूर्ण झालंय. मरीन ड्राईव्ह ते वांद्रे वरळी सी लिंक दरम्यान साडेदहा किलोमीटरचा कोस्टल रोड प्रकल्पाचा हा पहिला टप्पा नोव्हेंबर 2023 पर्यंत पूर्ण होणार आहे. मुंबईकरांना या सागरी मार्गाचा मोठा फायदा होणार आहे. 


मुंबईच्या दृष्टिकोनातून महत्वकांक्षी असलेला हा प्रकल्प तितकाच खर्चिक आहे. या रोडमुळे मुंबई आणि उपनगरातील वाहतूक कोंडी कमी होणार आहे. मुंबईचा कोस्टल रोड प्रकल्प हा दोन भागात विभागला गेला आहे. दक्षिण भाग आणि उत्तर भाग असे हे दोन भाग आहेत. यामध्ये दक्षिण भागाचं काम आधी हाती घेण्यात आलं आहे. मुंबई ते कांदिवली दरम्यान जवळपास 29 किलोमीटरचा हा कोस्टल रोड प्रकल्प आहे. दक्षिण कोस्टल प्रकल्प हा साडेदहा किलोमीटरचा आहे जो मरीन ड्राईव्हच्या प्रिन्सेस स्ट्रीट फ्लाओवर पासून सुरू होतो ते वरळी वांद्रे सी-लिंकपर्यंत आहे. 


सुरुवातीला मरीन ड्राईव्ह पासून ते प्रियदर्शनी पार्क पर्यंत दोन बोगदे आहेत, जे प्रति दोन किलोमीटरचे म्हणजे एकूण 4 किमीचे दोन बोगदे आहेत. हे बोगदे तीन प्रकारचे आहेत. अच्छादित बोगदे, गोलाकार आणि रॅम असे हे तीन प्रकार आहेत. मावळा या टनेल बोरिंग मशीनच्या साह्याने हे भूमिगत मार्ग तयार करण्यात आले आहेत. संपूर्ण दक्षिण कोस्टल रोड प्रकल्पासाठी 12700 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. यातील दोन बोगद्यापैकी एका बोगद्याचं काम पूर्ण झालं असून दुसऱ्या बोगदाचे काम 91 टक्के पूर्ण झालंय. 


कोस्टल रोड प्रकल्पामध्ये तीन इंटरचेंज आहेत. पहिला इंटर चेंज एमर्सन गार्डन, दुसरा इंटर चेंज हाजी अली आणि तिसरा इंटरचेंज वरळी येथे आहे. इंटरचेंजच्या दरम्यान पार्किंग व्यवस्था भूमिगत असणार आहे. जिथे 1600 वाहने पार्क केले जातील. संपूर्ण कोस्टल रोड हा आठ पदरी असेल तर बोगद्यातील मार्ग हा सहा पदरी असेल. भराव टाकलेल्या जागेवर सौंदर्यकरण आणि इतर प्रस्तावित छोटे-मोठे प्रकल्प आहेत, ज्यामध्ये गार्डन सायकल ट्रॅक जॉगिंग ट्रॅक तयार केला जाणार आहे. 


भराव टाकण्यात आलेल्या जागेवर मुंबईतील सागरी किनाऱ्यावरील सौंदर्य टिकून ठेवण्यासाठी या ठिकाणी सायकल ट्रॅक, जॉगिंग ट्रॅक, सार्वजनिक उद्याने आणि ओपन थिएटर हे सर्व छोटे मोठे प्रकल्प प्रस्तावित असतील. शिवाय मरीन ड्राईव्ह ते वरळी दरम्यानचं अंतर जिथे एक तास लागतो तिथे कोस्टल रोड प्रकल्पामुळे दहा मिनिटात हे अंतर पार होईल. 


Coastal Road : कसा असणार मुंबईचा कोस्टल रोड प्रकल्प?


> मुंबई ते कांदिवली 29 किलोमीटर लांबीचा हा कोस्टल रोड आहे.


> दक्षिण कोस्टल रोड हा 10.58 किमी लांबीला असून प्रकल्पाचा 70 टक्के काम पूर्ण झालंय


> प्रिन्सेस ट्रीप फ्लावर ते वांद्रे वरळी सी लिंक पर्यंत दक्षिण कोस्टल रोड प्रकल्प असेल


> एकूण प्रकल्पाचा खर्च 12,721 कोटी रुपये आहे


यामध्ये 15.66 किमी चे  तीन इंटरचेंज आणि 2.07 किमी चे एकूण दोन बोगद्यांचा समावेश असेल


कोस्टल रोड पूर्ण झाल्यानंतर प्रवासामध्ये 70 टक्के वेळेची बचत आणि 34 टक्के इंधन बचत होईल. ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषण कमी होईल