Mumbai Police : 9 वर्षापूर्वी अपहरण झालेली अल्पवयीन मुलगी पुन्हा आपल्या आईकडे! मुंबई पोलिसांची कामगिरी
डिसोझा दाम्पत्यानं आपल्या मुलीप्रमाणं सांभाळलं. मात्र तीन वर्षानंतर त्यांना स्वत:ची मुलगी झाली. नंतर त्यांनी पूजावर अन्याय करायला सुरुवात केली.
Mumbai Police : मुलीचे अपहरण झाल्याच्या नऊ वर्षांनंतर तिच्या आईशी पुन्हा त्यांची भेट झाली. अंधेरीच्या जुहू गल्ली येथील झोपडपट्टीत ही मुलगी राहत होती. तिथून एक किलोमीटर दूर राहिलेल्या जोडप्याने त्याचे अपहरण केले होते. या गुन्ह्यामध्ये डीएननगर पोलिसांनी हॅरी जोसेफ डिसोझा आणि त्याची पत्नी सोनी हॅरी डिसोझा या दोन्ही आरोपींना अटक केली आहे. या आरोपींकडून केलेल्या तपासात डिसोझा दाम्पत्याला मूल बाळ नसल्याने हा गुन्हा केला असल्याचे सांगितले आहे. पूजा संतोष गौड असं या मुलीचं नाव आहे.
काही दिवसांपूर्वी डीएननगर पोलीस ठाणे टीमला एका महिलेमार्फत खात्रीशीर माहिती मिळाली होती की, हरवलेली मुलगी पूजा गौड ही सध्या नेहरुनगर झोपडपट्टी गेट नं 05 विलेपार्ले (पं) मुंबई येथे आहे. सदर माहितीची खातरजमा करण्याकरता त्यांनी मिसिंग पथकाच्या टीमला कळवले. हरवलेल्या मुलीचा तिची आई पुनम गौड आणि तिचे नातेवाईकांसह शोध घेत होते.
पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी पूजाची माहिती दिलेल्या महिलेस विश्वासामध्ये घेवून अधिक माहिती घेतली आणि पूजाला सुखरूपपणे ताब्यात घेतलं. आई पुनम संतोष गौंड 38 वर्ष यांनी दिलेल्या तक्रारीवरून हॅरी जोसेफ डिसोझा आणि त्याची पत्नी सोनी हॅरी डिसोझा दोन्ही आरोपींना अटक केली. 10 ऑगस्टपर्यंत या दोघांना पोलिस कोठडीत पाठवलं आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार 22 जानेवारी 2013 रोजी पूजा शाळेतून आपल्या घरी अंधेरीतील गिल्बर्ट हिल परिसरात निघाली होती. मात्र ती घरी पोहोचलीच नाही. तिच्या घरच्यांनी तिचा शोध घेतला मात्र ती मिळाली नाही. पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर त्यांनीही पूजाचा शोध घेतला मात्र काहीच हाती लागले नाही.
पोलिस अधिकारी मिलिंद कुर्डे यांनी सांगितलं की, पूजा हरवल्यापासून तिचा शोध सुरु होता. अशात आम्हाला एका मुलीबाबत माहिती मिळाली. आम्ही डिसूजाची चौकशी केल्यानंतर आम्हाला संशय आला. त्यानंतर डिसूजा दाम्पत्य आणि त्या मुलीची वेगवेगळी चौकशी केली असता सत्य समोर आलं.
पोलिसांनी सांगितलं की, पूजाला हॅरी डिसोझानं तिच्या शाळेपासून किडनॅप केलं होतं. त्यानंतर त्याच्या पत्नीनं तिला आपल्या मुलीप्रमाणं सांभाळलं. मात्र तीन वर्षानंतर त्यांना स्वत:ची मुलगी झाली. नंतर त्यांनी पूजावर अन्याय करायला सुरुवात केली. संपूर्ण माहिती मिळाल्यानंतर पूजाला तिच्या परिवाराच्या स्वाधीन करण्यात आलं.