मुंबई : येस बँके उद्ध्वस्त करण्यामागे थ्री सिस्टर्स असल्याचं म्हटलं जात आहे. या थ्री सिस्टर्स सख्ख्या बहिणी आहेत. राधा कपूर, राखी कपूर आणि रोशनी कपूर अशी या थ्री सिस्टर्सची नावं आहेत. येस बँकेचे माजी सीईओ राणा कपूर यांच्या त्या मुली आहेत. येस बँक घोटाळ्यात हे तीन चेहरे तपास यंत्रणेच्या रडारवर आहेत.


राणा कपूर सध्या ईडी कोठडीत आहे. आता त्यांच्या मुली सीबीआयच्या निशाण्यावर आहेत. बँक घोटाळ्यात सीबीआयने गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. मुंबईतील सात ठिकाणी छापा टाकला आहे. तर राणा कपूर यांच्या मुलींचं कार्यालही सील करण्यात आलं आहे. मुंबईच्या इंडिया बुल्स इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर सीबीआयने छापा टाकला. राणा कपूर यांच्या तिन्ही मुली म्हणजेच थ्री सिस्टर्स या कंपनीच्या मालकीण आहेत. कंपनीचं नावही थ्री सिस्टर्स आहे.

गेल्या दोन ते तीन वर्षांपासून येस बँकेवर कर्जाचा बोजा आहे. बँकेचे बॅलन्सशीटही चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळेच अखेर आरबीआयने येस बँकेवर आर्थिक निर्बंध लादले आहेत. आता बँकेवर प्रशासकाचीही नियुक्ती करण्यात आली आहे. तसंच ग्राहकांना खात्यातून 50 हजार रुपयेच काढता येतील असंही म्हटलं आहे.

'द थ्री सिस्टर्स' कंपनी
द थ्री सिस्टर्स ही पॅरेंट कंपनी आहे, ज्याच्या अंतर्गत डूईट वेंचर, आर्ट कॅपिटल, कबड्डी संघ दबंग दिल्लीसह सुमारे 20 कंपन्या काम करतात. थ्री सिस्टर्स कंपनीचे संचालकच या कंपन्यांचे ग्रुप ऑफ डायरेक्टर आहेत.

Yes Bank | येस बँकेवर निर्बंध, खातेदारांना 50 हजारांपेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही

या तीन बहिणी आणि थ्री सिस्टर्स कंपनीवरील आरोप

येस बँकेने डीएचएफएल कंपनीला 3700 कोटी रुपयांचं कर्ज दिलं
DHFL ने DOIT अर्बन वेंचर्स लिमिटेडला 600 कोटी रुपयांचं कर्ज दिलं
DOIT अर्बनच्या मालकीण राणा कपूर यांच्या तिन्ही मुली आहेत.
DHFL ने कर्जासाठी जे तारण म्हणून ठेवलं, त्याची किंमत 40 कोटी रुपये होती.

आरोप हाच आहे की येस बँकेने सर्वात आधी DHFL ला कर्ज दिलं. यानंतर DHFL ने राणा कपूर यांच्या मुलीची कंपनी DOIT अर्बन इंडिया प्रायवेट लिमिटेडला कर्ज दिलं. जी डीएचएफएलकडून लाच समजली जात होती. कारण तेव्हा दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या DHFL कंपनीला कर्ज देणं नियामांच्या विरोधात होतं.

म्हणजेच 600 कोटी रुपयांच्या वैयक्तिक लाभासाठी जनतेचा पैसा वापरला. आता सीबीआय याच 600 कोटी रुपयांच्या तपासात गुंतली आहे. याचा खुलासा झाला तर राणा कपूर यांची मुलगी आणि पत्नीला ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजेरी लावावी लागली. रविवारी रात्री दहाच्या सुमारास दोघी ईडी कार्यालयात पोहोचल्या. तीन तासांच्या चौकशीनंतर दोघींना घरी जाण्याची परवानगी देण्यात आली.

Yes Bank Crisis | येस बँकेच्या खातेदारांचे पैसे कौटुंबिक स्वार्थासाठी वापरले?