हम नही सुधरेंगे! नाईट कर्फ्यूतही पार्सल सेवा, दारुची दुकानं सुरुच
मुंबईसह इतर महानगरपालिका क्षेत्रात नाईट कर्फ्यूची घोषणा केली. मात्र काही नागरिकांनी नाईट कर्फ्यूला गांभीर्याने न घेतल्याचं गंभीर दृश्य सध्या पाहायला मिळत आहे.

दीपेश त्रिपाठी आणि सत्यम सिंग, ABP माझा, मुंबई : लंडनमध्ये (Coronavirus) कोरोनाचा नवीन प्रकार सापडल्यानंतर आणि सध्याच्या कोरोनाची परिस्थिती पाहता नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लोकांची गर्दी होऊ नये म्हणून राज्य सरकारने महाराष्ट्र आणि (Mumbai) मुंबईसह इतर महानगरपालिका क्षेत्रात नाईट कर्फ्यूची घोषणा केली. मात्र काही नागरिकांनी नाईट कर्फ्यूला गांभीर्याने न घेतल्याचं गंभीर दृश्य सध्या पाहायला मिळत आहे.
मुंबईच्या रस्त्यांवर रात्री एक वाजण्याच्या सुमारासही राजरोसपणे बार उघडून दारूविक्री सुरु असल्याची धक्कादायक माहिती एबीपीच्या रिअॅलिटी चेकमध्ये समोर आली. इतकंच नव्हे, तर खाण्याचे पार्सल देण्याचं सत्रही सुरु असून, ते घेणाऱ्यांचीही गर्दी काही कमी नाही हीच बाब पाहायला मिळाली. नियम लागू झाल्यापासून सर्व काही बंद असताना सकाळी 3 ते 4 वाजे पर्यंत पार्सल सुरू असल्याची धक्कादायक बाबही आढळून आली.
मुख्य म्हणजे नाईट कर्फ्यू आणि संचारबंदीचे नियम लागू करतेवेळी यामध्ये अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आल्याचीच बाब यंत्रणांकडून स्पष्ट करण्यात आली होती. पण, यातही आता प्रश्न असा की, दारू जीवनावश्यक वस्तूंमध्ये येते का ? आणि दारू-मौज मजेसाठी कोरोनासारख्या जीवघेण्या आजारालासुद्धा लोकं जुमानत नाहीत का?
परिस्थिती अशीच असेल तर, काही काही दिवसांन पूर्वी मुंबई पोलिसांनकडून करण्यात येणाऱ्या कारवाईची पुनरावृत्ती होण्याची वेळ आली हे नाकारता येत नाही. काही महिन्यांपूर्वी मुंबईमध्ये जेव्हा कोरोना शिगेला होता त्यावेळेस मुंबई पोलीस यंत्रणा नागरिक आणि कोरोना या दोघांमध्ये भिंत बनून उभे राहिले होते. अशीच काहीशी गरज पुन्हा निर्माण झाली आहे.
कोरोना जेव्हा मुंबईत झपाट्यानं बळावत होता तेव्हा मुंबई पोलिसांनी आपल्या जीवाची पर्वा न करता 24 तास जागता पहारा देत लोकांना विनाकारण त्यांच्या घराबाहेर पडू दिलं नाही. त्यामुळे मुंबईमध्ये कोरोनाला रोखण्यास पोलीसरुपी कोरोना योद्ध्यांना यश आलं होतं.
समाज सुधार शाखेची कारवाई
मुंबईच्या सदगुरु बारमध्ये रात्री पोलीसांच्या समाज सुधारण शाखेने धाड टाकत नाईट कर्फ्युचे नियम मोडणाऱ्यांन विरोधात कारवाई केली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुंबईमध्ये काही ठिकाणी अशी कारवाई समाज सुधार शाखेकडून करण्यात आली ज्यामुळे नाईट कर्फ्युच किती काटेकोरपणे पालन होतंय हे स्पस्ट झालं. कोरोना अजून संपलेला नाही आहे. कोरोनाची लस शेवटच्या टप्यात असली तरीही निष्काळजी राहून चालणार नाही. पण तरीही अनेकजण आपल्या मौजमजेसाठी इतरांचाही जीव धोक्यात घालत आहेत. तेव्हा सरकार कडून घालण्यात आलेलं निर्बंध हे निर्बंध नसून आपले प्राण वाचवण्यासाठीच मंत्र आहे ज्याला सर्वांनी अमलात आणल्याशिवाय गत्यंतर नाही ही बाब लक्षात घ्या आणि कोरोनापासून दूर राहा.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
