मुंबई : एकीकडे मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचा कट शिजत असल्याच्या बातम्या येत असताना या दहशतवादी कारवायांना आळा घालणाऱ्या एटीएसकडे 100 हून अधिक जागा रिक्त असल्याची आणि एटीएसकडे एकही एसीपी दर्जाचा अधिकारी नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने सहा अतिरेक्यांना अटक केल्यानंतर मुंबईवरील दहशतवादी हल्ला तात्पुरता टळला असला तरी एटीएस या सर्वाधिक महत्वाच्या दलामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात जागा रिक्त असल्याने चिंतेत भर पडली आहे. 


राज्याच्या गृहविभागाच्या सूत्रांनी सांगितलं की, सध्या एटीएसमध्ये मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची कमतरता आहे. त्यामुळे जे अधिकारी आणि कर्मचारी मुंबईत इतरत्र पोस्टिंगमध्ये आहेत त्यांच्यावरच हा अतिरिक्त भार टाकण्यात आला आहे. मुंबई एटीएसचे कार्यालय हे कालाचौकी, नागपाडा, जुहू, कूरार आणि विक्रोळी येथे आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून ती नेहमीच अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर राहिली आहे. 


गृहविभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील एटीएसमध्ये सध्या 100 हून अधिक पदं रिक्त आहेत. त्यामध्ये जवळपास 50 पदं ही अधिकारी दर्जाची आहेत तर 50 हून अधिक पदं ही कॉन्स्टेबल दर्जाची आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे मुंबई एटीएस दलात एकूण पाच एसीपी दर्जाचे अधिकारी पदं आहेत आणि यातील एकाही पदावर सध्या कुणाची नियुक्ती नाही. एटीएसमध्ये बहुतांशी गुन्हे हे  UAPA कायद्याच्या अंतर्गत नोंद होतात.  UAPA कायद्यांतर्गत नोंद झालेल्या गुन्ह्यांचा तपास हा एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्याकडे असतो. 


मुंबई आणि भारतातील अनेक शहरं बॉम्बस्फोटांनी हादरवून टाकण्याचा कट दिल्लीतील केंद्रीय सुरक्षा यंत्रणांनी उधळून लावला. या गटातील एक मुख्य सूत्रधार मुंबईत राहत होता. त्याचं नाव जान मोहम्मद असं होतं. जान आणि त्याचा एक साथीदार गोल्डन टेंपल या ट्रेनमधून प्रवास करून दिल्लीत घाईघाईनं जात होते. मात्र तपास यंत्रणांनी त्याला ट्रेनमध्येच पकडलं. पण त्याच्या साथीदाराला पकडण्यात यश आलं नाही. त्यामुळेच महाराष्ट्रातील सर्व सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर राहून सध्या काम करत आहेत. या दहशतवाद्यांनी मुंबई लोकलची देखील रेकी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.


संबंधित बातम्या :