मुंबई : मुंबईत एका संदिग्ध दहशतवाद्याला अटक केल्यानंतर सर्वच तपास यंत्रणा कामाला लागली आहे. हा दहशतवादी मुंबई लोकलमधून प्रवास करून दिल्लीला जात असल्यानं मुंबई लोकलच्या सुरक्षेबाबत देखील हायअलर्ट दिलेला आहे. याच पार्श्वभूमीवर काल (बुधवारी) आरपीएफचे आयुक्त जितेंदर श्रीवास्तव, रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालिद आणि मध्य रेल्वेचे विभागीय संचालक शलभ गोयल यांच्यात एक महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मुंबई लोकलच्या सुरक्षेबरोबरच महिलांच्या सुरक्षेबाबत देखील ॲक्शन प्लान तयार करण्यात आलेला आहे. तसेच लोकलच्या सुरक्षेसाठी एक नवीन मॉडेल तयार करण्यात येत असल्याची माहिती एबीपी माझाला सुत्रांनी दिली आहे.


मुंबई आणि भारतातील अनेक शहरं बॉम्बस्फोटांनी हादरवून टाकण्याचा कट दिल्लीतील केंद्रीय सुरक्षा यंत्रणांनी उधळून लावला. या गटातील एक मुख्य सूत्रधार मुंबईत राहत होता. त्याचं नाव जान मोहम्मद असं होतं. जान आणि त्याचा एक साथीदार गोल्डन टेंपल या ट्रेनमधून प्रवास करून दिल्लीत घाईघाईनं जात होते. मात्र तपास यंत्रणांनी त्याला ट्रेनमध्येच पकडलं. पण त्याच्या साथीदाराला पकडण्यात यश आलं नाही. त्यामुळेच महाराष्ट्रातील सर्व सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर राहून सध्या काम करत आहेत. या दहशतवाद्यांनी मुंबई लोकलची देखील रेकी केल्याची धक्कादायक माहिती मिळाल्यानं काल (बुधवारी) मध्य रेल्वेच्या मुख्यालयात मुंबईचे विभागीय संचालक शलभ गोयल, रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालिद आणि आरपीएफचे विभागीय सुरक्षा आयुक्त जितेंद्र श्रीवास्तव यांची एक महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मिळेलेल्या माहितीवरून अतिरिक्त सुरक्षा वाढवण्याचं ठरवण्यात आलं आहे. 


इतर शहरांप्रमाणे मुंबईत प्रत्येक प्रवाशाची चेकिंग करणं शक्य नसल्यानं, एक नवीन सुरक्षेचं मॉडल तयार करण्यात येणार असल्याचं सुत्रांनी सांगितलं आहे. सध्या बॉम्ब शोधक पथक, सीसीटीव्ही, बॅग स्कॅनर मशीन आणि रँडम चेकिंगद्वारे स्थानकांवर सुरक्षा देण्यात येत आहे. यात मोठ्या प्रमाणात वाढ केली जाईल आणि ही यंत्रणा अद्ययावत केली जाईल, असं आरपीएफचे विभागीय सुरक्षा आयुक्त जितेंद्र श्रीवास्तव यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं. 


दहशतवाद्यांकडून मुंबई लोकलसह महत्त्वाच्या ठिकाणांची रेकी


दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या 6 दहशतवाद्यांसंदर्भात एक मोठा खुलासा झाला आहे. मुंबई लोकल पुन्हा एकदा दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आली आहे. दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा मुंबई लोकलवर निशाणा साधण्याचा कट रचला होता. त्यांनी मुंबई लोकलची रेकी केली होती. असी धक्कादायक माहिती समोर येत आहे. तसेच घातपाताचा कट यशस्वी करण्यासाठी त्यांनी राज्यातील अनेक महत्त्वाची ठिकाणंही दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असल्याची माहिती मिळत आहे. तसेच हा कट यशस्वी करण्यासाठी अनेक ठिकाणी विस्फोटकं पोहोचवण्यात आली आहेत, असं दिल्ली पोलिसांच्या तपासात उघड झालं आहे. 


दिल्ली पोलिसांनी ज्या सहा दहशतवाद्यांना ताब्यात घेतलं, त्यांची चौकशी सुरु आहेत. चौकशी दरम्यान, एका दहशतवाद्यानं सांगितलं की, आम्ही मुंबई लोकलची संपूर्ण रेकी केली होती. यापूर्वी मुंबई लोकल अनेकदा दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आली आहे. मुंबई लोकलमध्ये यापूर्वी सीरिअल बॉम्बस्फोट झाले आहेत. त्यामुळे दहशतवाद्यांचा मुंबई लोकलची रेकी करण्यामागे नक्की काय हेतू होता? याबाबत तपासयंत्रणा आणखी तपास करत आहेत. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :