Sonu Sood Income Tax Survey : बॉलिवूड अभिनेता सोनू सूदच्या घर आणि कार्यालयाची जवळपास 20 तास आयकर विभागाकडून पाहणी करण्यात आली. बुधवारी पहाटे सहा वाजल्यापासून आयकर विभागाच्या 12 जणांचं पथक अभिनेता सोनू सूदच्या घरी दाखल झालं होतं. त्यानंतर सोनू सूद आणि कुटुंबियांचे फोन आयकर विभागाकडून बंद करण्यात आले होते. दरम्यान, घर आणि कार्यालयासह एकूण 6 जागी आयकर विभागानं पाहणी केली. 


आयकर विभागानं तब्बल 20 तास सोनू सूदच्या घराची पाहणी केली. सोनूचं मुंबईतील कार्यालय, हॉटेल आणि घरासह 6 ठिकाणांची आयकर विभागानं पाहणी केली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी पहाटे सहा वाजता पाहणी सुरु केली होती. मात्र, आयकर विभागानं ही कारवाई का केली? याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. 


सोनू सूद नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असल्याचं पाहायला मिळतं. परंतु, आयकर विभागाच्या या पाहणीबाबत सोनूनं अद्याप कोणतीच माहिती दिलेली नाही. अशातच आयकर विभागानं पाहणी केल्यानंतर सोनूच्या घरातून काही दस्तावेज ताब्यात घेतले आहेत. परंतु, या पाहणीदरम्यान, सोनू सूदच्या घर, कार्यालयातून आयकर विभागाच्या हाती नक्की काय लागलं, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. 


अभिनेता  सोनू सूदच्या घर आणि कार्यालयासह सहा ठिकाणी आयकर विभागाकडून  पाहणी करण्यात आली. याबाबत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्वीट केले आहे. ते म्हणाले की, "सत्याच्या मार्गावर लाखो अडचणी येतात. पण विजय नेहमीच सत्याचा होतो. सोनू सूद यांच्यासोबत देशातील लाखो कुटुंबियांचे आशीर्वाद आहेत. ज्या कुटुंबियांना सोनू सूदनं अडचणींच्या काळात मदत केली."


दरम्यान, कोरोना प्रादुर्भावात सोनू सूद अनेकांसाठी देवदूत ठरला होता. सोनूनं अनेकांना सढळ हातानं मदत केली होती. त्यामुळे लोकांनीही सोनूवर भरभरून प्रेम केलं. तसेच कोरोना काळात आपापल्या घरी परतणाऱ्या मजुरांनाही सोनूनं आर्थिक मदत केली होती. तसेच मजुरांसाठी जेवण, बसची व्यवस्था यांसारख्या सोयीही पुरवल्या होत्या. यावरुन सोनू सुदवर कौतुकाचा वर्षावही केला जात होता. मात्र दुसरीकडे सोनूवर आरोपही केले गेले.