Terrorist Arrested : दाऊद इब्राहिम म्हणजे मुंबईचा जुना शत्रू. याच दाऊदनं मुंबईवर वक्रदृष्टी टाकल्यनं आता तपास यंत्रणांची झोप उडाली आहे. मुंबई आणि दिल्लीत घातपाताचा कट आखणाऱ्या सहा दहशतवाद्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यापैकी एका दहशतवाद्याचं मुंबईतील सायन परिसरात वास्तव्य होतं, अशी धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. जान मोहम्मद अली शेख, असं अटक करण्यात आलेल्या मुंबईत वास्तव्यास असणाऱ्या दहशतवाद्याचं नाव आहे. महाराष्ट्रातील दहशतवादी विरोधी पथकानं काल जान मोहम्मदच्या घरी जाऊन तपास सुरु केला आहे. तसेच त्याच्यासोबत राहत असलेल्या साथीदारांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे. 


समोर आलेल्या धक्कादायक माहितीनुसार, जान महोम्मद अली शेख आणि त्याच्या साथीदारांना दाऊद इब्राहिमकडून रसद पुरवली जात होती. त्यामुळे जान महोम्मदचे आणखी कुणी साथीदार आहेत का? त्यांचा नेमका मनसुबा काय आहे? याचा छडा लावण्याचं तपास यंत्रणेसमोर आव्हान आहे. 


कोण आहे जान मोहम्मद अली शेख?


जान मोहम्मद अली शेख सायन पश्चिमेकडील एमजी रोडवर असणाऱ्या कालाबखर परिसरात वास्तव्यास होता. सायन येथील तो फार जुना रहिवाशी आहे. त्याच्यासोबत त्याची पत्नी आणि दोन मुली असे चौघेजण या घरात राहत होते. मुंबईच्या धारावीमध्ये जान मोहम्मदच्या घराच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांचं म्हणणं आहे की, जान मोहम्मदनं तीन दिवसांपूर्वी आमच्यासोबत चहा घेतला. तो स्वभावानं चांगला होता. ड्रायव्हर म्हणून काम करत होता. जान मोहम्मद धारावी परिसरात बऱ्याच वर्षांपासून राहत होता. जान महोम्मद दहशदवादी कटात सहभागी होता, या बातमीनं त्याच्या घराच्या आजूबाजूला राहणाऱ्या सर्वांनाच धक्का बसला आहे. तसेच त्याचा स्वभाव अत्यंत साधा होता म्हणून, तो दहशतवादी कटात सहभागी असेल, असा संशयही कधी आला नाही. 


भारतात स्फोट घडवण्याचा तयारीत असलेल्या सहा दहशतवाद्यांना अटक


दिल्ली पोलिसांनी सहा दहशतवाद्यांना अटक केली आहे. त्यापैकी दोघांनी पाकिस्तानात प्रशिक्षण घेतले होते, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतून दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे तर उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधून चौघांना अटक करण्यात आली आहे.


दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने या दहशतवाद्यांना अटक केली आहे. पोलिसांनी एका गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली. स्पेशल सेलला माहिती मिळाली होती की पाकिस्तान समर्थित दहशतवादी गट दिल्ली आणि जवळपासच्या भागात स्फोट घडवण्याचा कट आखत आहेत आणि त्यांचं लक्ष्य गर्दीची ठिकाणं आहेत. 


स्पेशल सेलचे डीसीपी प्रमोद कुमार कुशवाह म्हणाले की, दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने पाकिस्तान सपोर्टेड दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला आहे. दोघांनी पाकिस्तानातून प्रशिक्षण घेतले होते. दहशतवाद्यांकडून स्फोटके आणि शस्त्रे देखील जप्त करण्यात आली आहेत. 


पाकिस्तानात कसे पोहोचले?


स्पेशल सीपी नीरज ठाकूर म्हणाले की, तपासात आढळून आले की हे अनेक राज्यांमध्ये पसरलेले मोठे नेटवर्क आहे. आज सकाळी हे ऑपरेशन पूर्ण करून आम्ही अनेक राज्यांमध्ये छापे टाकले. सर्वात आधी महाराष्ट्रातील समीर नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली. त्याला कोटा येथे एका ट्रेनमध्ये अटक करण्यात आली. यानंतर दिल्लीत दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्या चौकशीच्या आधारे यूपीमधून तीन जणांना अटक करण्यात आली. यापैकी दोन लोक यावर्षी एप्रिलमध्ये मस्कतला गेले होते. तेथून त्यांना जहाजातून पाकिस्तानात नेण्यात आले. तेथे ते एका फार्म हाऊसमध्ये राहत होते. येथेच त्यांना स्फोटकं बनवण्याचे आणि इतर प्रशिक्षण देण्यात आले. हे प्रशिक्षण सुमारे 15 दिवसांचे होते. या प्रशिक्षणानंतर हे लोक तेथून मस्कतला परत आले.


नीरज ठाकूर यांनी पुढे सांगितलं की, एक विशेष गोष्ट म्हणजे जेव्हा हे लोक मस्कतला जात होते, तेव्हा त्यांच्या गटात सुमारे 14-15 बंगाली भाषिक लोक होते. ज्यांना देखील प्रशिक्षणासाठी नेण्यात आले होते. तिथून परत आल्यानंतर या दहशतवाद्यांनी स्लीपर सेल्ससारखे काम सुरू केले. येथे दोन टीम तयार केल्या असल्याची माहिती समोर येत आहे. यातील एक टीम दाऊद इब्राहिमचा भाऊ अनीस इब्राहिम को ऑर्डिनेट करत होता. सीमेपलीकडून येणारी शस्त्रे भारतातील विविध शहरांमध्ये लपवून ठेवणे हे या टीमचे काम होते. त्याचे दुसरे काम निधी गोळा करणे होते. महाराष्ट्रातून अटक केलेला समीर आणि यूपीमधून अटक करण्यात आलेला लाला नावाचा व्यक्ती या अंडरवर्ल्ड ग्रुपचा भाग होता.