Mumbai AC Double Decker Bus:  मुंबईकरांची दुसरी लाइफलाइन समजल्या जाणाऱ्या बेस्ट बसच्या ताफ्यात इलेक्ट्रीक डबलडेकर बसचा आज समावेश करण्यात आला. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते मुंबईत एका कार्यक्रमात डबलडेकर बसचे उद्घाटन करण्यात आले.  प्रदुषण मुक्त देशासाठी इलेक्ट्रीक बस हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे नितीन गडकरी यांनी म्हटले.


मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आज बेस्टच्या ताफ्यातील इलेक्ट्रीक बसचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र आणि इतर अधिकारीदेखील असतात. यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की,  आज डबल डेकर बस बेस्टच्या ताफ्यात येत असल्याने मी आनंदित आहे. प्रदुषण मुक्त देशासाठी हे महत्त्वाचे पाऊल आहे. एकूण प्रदूषणांपैकी 35 टक्के प्रदूषण हे पेट्रोल आणि डिझेलमुळे होत आहे. इलेक्ट्रीक वाहनांमुळे प्रदूषणात घट होईल असेही त्यांनी सांगितले.


इलेक्ट्रीक बसने प्रवास करणे खूप स्वस्त आहे असल्याचेही गडकरी यांनी म्हटले. आता लक्झरी बस सुरू कारण्याचा विचार करावा जेणेकरून आपण अनेक शहरांमधून प्रवास करू शकू. लांबच्या पल्ल्याचा प्रवासही या प्रकारच्या बसने करता येईल. या बसने मुंबई-दिल्ली असा 12 तासांचा प्रवास करणे शक्य होईल असेही गडकरी यांनी म्हटले. नरिमन पॉईंट ते दिल्ली असा मार्ग तयार करण्याचे स्वप्न असल्याचे नितीन गडकरी यांनी म्हटले. देशातील ऑटोमोबाइल क्षेत्राचा व्यवसाय 50 लाख कोटींपर्यंत नेण्याचा प्रयत्न असल्याचे गडकरी यांनी सांगितले. आज संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकापर्ण करण्यात येणार आहे. सप्टेंबर महिन्यापासून एसी डबलडेकर बस मुंबईकरांच्या सेवेत रुजू होतील. 


बेस्टमध्ये आजपासून आधुनिक पर्व
 
मुंबईकरांच्या मनात दुमजली म्हणजे डबलडेकर बसबद्दल कायमच आकर्षण राहिले आहे. ताफ्यातील डबलडेकर बस जुन्या झाल्याने नव्या बसच्या पर्यायांवर विचार सुरू करण्यात आला होता. त्यानंतर आता एसी डबलडेकर बसचा समावेश बेस्टने आपल्या ताफ्यात केला आहे. ही बस जागतिक दर्जाची असल्याचा दावा करण्यात आला आहे. 'स्विच मोबिलिटी' कडून 900 इलेक्ट्रीक बसेस वेट लीज तत्वावर बेस्ट घेणार आहे. त्यातील तीन बसेस मुंबईत दाखल झाल्या आहेत. पुढील


वैशिष्ट्ये काय?


या इलेक्ट्रीक बसमध्ये दोन जीने असणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना चढ-उतार करणे अधिक सोप होणार आहे. गर्दीच्या वेळी याचा फायदा होईल. त्याशिवाय बसमध्ये सीसीटीव्हीदेखील असणार आहे. 


कोणत्या मार्गावर धावणार?


बेस्टची इलेक्ट्रीक बस तीन मार्गांवर धावण्याची शक्यता आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-बोरिबंदर ते  नरिमन पॉईंट, कुलाबा ते वरळी आणि कुर्ला ते सांताक्रूझ या मार्गांवर बस चालवण्यात येण्याची दाट शक्यता आहे. 


तिकीट दर किती?


या बसचे तिकिट दर किमान पाच किमी अंतरापर्यंत सहा रुपये असणार आहे. सध्या असलेल्या एसी बसच्या दराप्रमाणे या बसचे दर असणार आहेत.