India Coronavirus Case : देशातील कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव थांबण्याचं नाव घेत नाही. पुन्हा एकदा देशातील कोरोनाबाधितांची (Corona Patients) संख्या झपाट्यानं वाढत असल्याचं दिसत आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 12 हजार 608 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 16 हजार 251 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. 


सध्या देशातील सक्रिय रुग्णांची संख्या वाढून 1 लाख 01 हजार 243 वर पोहोचली आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांचा एकूण आकडा 4 कोटी 42 लाख 98 हजार 864 वर पोहोचला आहे. मृतांच्या एकूण आकड्याबाबत बोलायचं झालं तर, हा आकडा 5 लाख 27 हजार 206 वर पोहोचला आहे. मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशाचा दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 3.48 टक्क्यांवर पोहोचला आहे. 



लसीकरणाता आकडा 20 कोटी 38 लाखांच्या पार 


देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा आकडा वेगानं वाढत आहे. लसीकरण मोहिमेबाबत आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 38 लाख 64 हजार 471 लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. तेव्हापासून आतापर्यंत 2089579722 नागरिकांनी कोरोनाची लस घेतली आहे. 


देशात वाढणाऱ्या कोरोनाच्या आकडेवारीबाबत नीति आयोगाचे सदस्य डॉ. वीके पॉल (Dr VK Paul) यांनी चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, कोरोना अद्याप गेलेला नाही. त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष करु नका. तसेच, त्यांनी नागरिकांना सतर्क राहून काळजी घेण्याचंही आवाहन केलं आहे. 


मुंबईतही कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव 


एकीकडे देशाची राजधानी दिल्लीमध्ये कोरोनाबाधितांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारनं संपूर्ण शहरात मास्कसक्ती केली आहे. अशातच देशाच्या आर्थिक राजधानीचं शहर असणाऱ्या मुंबईतही कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. काल (बुधवारी) दिवसभरात मुंबईत 975 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईतील सक्रिय रुग्णांची संख्या 5194 वर पोहोचली आहे. तसेच, शहराचा रुग्ण दुपटीचा कालावधी 1088 दिवसांवर पोहोचला आहे. तसेच, गेल्या 24 तासांत मुंबईत 850 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.