Maharashtra CM Convoy : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या ताफ्यात (Convoy) घुसलेल्या एका कार चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. मुंबईतील वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये (Bandra Police Station) कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र त्याला कोर्टाकडून जामीन (Bail) मिळाल्याची माहिती पोलिसांनी दिली.


27 जुलै रोजी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात गाडी घुसवण्याचा प्रयत्न


मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात कार घुसवण्याच्या आरोपात वांद्रे पोलिसांनी कार चालकाला अटक केली होती. गंगू रझाक असं या चालकाचं नाव आहे. 27 जुलै रोजी रात्री पावणे बाराच्या सुमारास त्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यात आपली कार घुसवली होती. मुख्यमंत्र्यांचा ताफा वांद्रे वरळी सी लिंकवरुन जात होता. टोल प्लाझावरुन त्यांचा ताफा रवाना झाला, त्याचवेळी बाजूच्या लेन क्रमांक 6 मध्ये उभी असलेल्या कार चालकाने मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याच्या मागोमाग घेऊन गेला. त्याला अडवण्याचा प्रयत्न केला असता त्याने कोणाचंही न ऐकता गाडी मुख्यमंत्र्याच्या ताफ्याच्या मागोमाग घेतली.


या प्रकरणी पोलीस कर्मचारी मारुती शिंगटे यांनी वांद्रे पोलिसात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारवरुन कार चालक गंगू रझाक विरोधात आयपीसीच्या कलम 188,279 आणि 336 सह मोटर वाहन कायद्याच्या कलम 184, 179 अंतर्गत गुन्हा दाखल करुन त्याला बेड्या ठोकल्या होत्या.


कार चालक म्हणाला...


पोलिसांनी कार चालक गंगू रझाकची चौकशी केली असता त्याने सांगितलं की, ताफ्याच्या मागे जाण्याचा त्याचा कोणताही इरादा नव्हता. तो काही कामानिमित्त जात होत आणि गाडी ताफ्याच्या अगदी मागे ठेवली.व्हीआयपी ताफ्याच्या मागे गाडी ठेवल्यावर कोणती कारवाई होईल याबाबत आपल्याला कोणतीच कल्पना नव्हती.


चालकाला कोर्टाकडून जामीन मंजूर


दरम्यान संबंधित कार चालक गंगू रझाकला कोर्टात हजर केलं असता त्याला जामीन मंजूर झाल्याची माहिती वांद्रे पोलिसांनी दिली.


हेही वाचा


शिवसेनेचे पालकमंत्री असूनही निधी मिळत नसल्याने शिंदे गटात संघर्ष; भाजपचीच सर्वाधिक कामे