(Source: Poll of Polls)
'बंद होण्याच्या मार्गावर', मुंबईतील वडाळा सुन्नी मुस्लीम कब्रस्तानच्या गेटवर बोर्ड
मुंबईच्या अनेक कब्रस्तानमध्ये आता मृतदेह दफन करण्यासाठी जागा कमी पडत आहे. "कब्रस्तान बंद होण्याच्या मार्गावर", असा बोर्ड वडाळा सुन्नी मुस्लीम कब्रस्तानच्या गेटवर लावण्यात आला आहे.
मुंबई : मुंबई कोरोना संसर्गाचा दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. या लाटेत अनेकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. पण आता परिस्थिती अशी आहे की, मुंबईच्या अनेक कब्रस्तानमध्ये आता दफन करण्यासाठी जागा कमी पडत आहे. मुंबईच्या वडाळा परिसरात असलेल्या सुन्नी कब्रस्तानाच्या गेटवर 'इथे जागा अतिशय कमी पडत आहे' असा बोर्ड लावला आहे.
वडाळा सुन्नी मुस्लीम कब्रस्तानचे अध्यक्ष महमूद खान यांनी सांगितलं की, "कब्रस्तान बंद होण्याच्या मार्गावर आहे. इथे जागा फारच कमी आहे. महत्त्वाचं म्हणजे मुंबई महापालिकेनेही जागेचा तुटवडा असल्याचं मान्य केलं आहे.
या कब्रस्तानमध्ये एकूण 11 प्लॉट आहेत, जे विविध लोकांसाठी विभागण्यात आलं आहे. हे प्लॉट लहान मुलं, सामान्य आजार आणि कोविडमुळे मृत्यू झालेल्यांसाठी विभागले आहेत.
कब्रस्तानच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं की, "इथे जवळपास 1132 कब्र आहेत, ज्यापैकी सध्या 128 कब्र शिल्लक राहिल्या आहेत. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांसाठी एक प्लॉट आरक्षित केला आहे, त्यात जवळपास 165 कब्र आहेत. तर सामान्य आजाराने मृत्युमुखी पडलेल्या मृतदेहांसाठी 839 कब्र आहेत.
बीएमसीच्या नियमानुसार कब्रमध्ये मृतदेहांचं 18 महिन्यात पूर्णत: विघटन होतं. पण सध्याच्या परिस्थितीत वेळेचा अभाव पाहता हे होऊ शकत नाही. कारण कोरोनामुळे मृत्यूंचं प्रमाण वाढलं आहे. मृतदेहांची संख्या वाढल्याने 10 ते 12 महिन्यांच्या आतच दफन करावं लागतं. परिणामी कब्रमधून अर्धवट विघटन झालेले मृतदेह बाहेर काढावे लागतात. आता परिस्थिती अशी आहे की, कब्रस्तानमध्ये मृतदेह येण्याची संख्या अशीच वाढली तर काही दिवसात ते बंद पडू शकतं.
महमूद खान यांच्या माहितीनुसार आमच्या क्षेत्रात लोकसंख्या जास्त आहे आणि कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यूंची संख्याही वाढली आहे. यामुळे कब्रस्तानमध्ये जागेचा अभाव दिसत आहे. याची माहिती बीएमसीलाही देण्यात आली आहे यासाठी सरकारकडे नवीन जागा द्यावी याबाबत विनंती करण्यात आली आहे.
याच कब्रस्तानचे सचिव इस्तियाग शेख यांनी सांगितलं की, "यापूर्वी एका महिन्यात जवळपास 30 ते 40 मृतदेहच यायचे. पण कोरोना काळात मृतदेहांचे आकडे वाढून 60 ते 70 च्या जवळपास पोहोचले आहेत. म्हणजेच दररोज दोनपेक्षा जास्त मृतदेह येऊ लागले आहेत, त्यामुळे कब्र वेळेआधी खोदावी लागत आहे. यामुळे अर्धवट विघटन झालेले मृतदेह बाहेर काढावे लागतात.
यासाठी सरकारला आवाहन आहे की, "कब्रस्तानसाठी नव्या जागेची व्यवस्था केली जावी. असं झालं नाही तर कोरोनाची तिसरी लाट आली आणि मृतांचा आकडा वाढला तर परिस्थिती आणखी बिकट बनेल."