Mumbai Metro : नवी मुंबईकरांसाठी गूड न्यूज! सीबीडी ते तळोजा मेट्रोची चाचणी पूर्ण
Mumbai Metro : सीबीडी ते तळोजापर्यंत उभा करण्यात आलेल्या मेट्रोची आज चाचणी करण्यात आली. नवी मुंबईतील या मेट्रो लाईनसाठी 3 हजार 500 करोड रूपये खर्च करण्यात आला आहे.
Mumbai Metro : सीबीडी ते तळोजा मेट्रो रेलची (Metro) चाचणी आज पूर्ण झाली आहे. त्यामुळे पुढील सहा महिन्यात ही मेट्रो नवी मुंबईकरांसाठी सुरू होणार आहे. तळोजामधून सुटलेल्या मेट्रो गाडीचे सीबीडी स्टेशनवर स्वागत करण्यात आले. यावेळी पूर्ण लाईनच्या चाचणीसाठी सिडकोचे एमडी डॉ. संजय मुखर्जी उपस्थित होते.
सीबीडी ते तळोजापर्यंत उभा करण्यात आलेल्या मेट्रोची आज चाचणी करण्यात आली. नवी मुंबईतील या मेट्रो लाईनसाठी 3 हजार 500 करोड रूपये खर्च करण्यात आला आहे. यातील 500 करोड रूपयांचे कर्ज आयसीआयसीआय बॅंकेकडून सिडकोने काही महिन्यांपूर्वी घेतलेले आहे.
Mumbai Metro : 12 वर्षांपासून प्रतिक्षा
दरम्यान, गेल्या 12 वर्षांपासून नवी मुंबईकर या मेट्रोच्या प्रतिक्षेत आहेत. सध्या मेट्रोच्या ट्रॅकचे काम पूर्ण झाले असले तरी अजून पाच मेट्रो स्टेशनचे काम बाकी असल्याने अजून सहा महिने तरी प्रवाशांना मेट्रोत बसण्यासाठी वाट पहावी लागणार आहे.
Mumbai Metro : नवी मुंबई मेट्रो मार्गावर 11 स्थानके
नवी मुंबई मेट्रो मार्गावर 11 स्थानके आहेत. सीबीडी-बेलापूर, सेक्टर 7, सिडको सायन्स पार्क, उत्सव चौक, खारघर सेक्टर 11, खारघर, सेक्टर 14, खारघर सेंट्रल पार्क, पेठपाडा, खारघर सेक्टर 34, पाचनंद आणि पेंधर-तळोजा ही 11 स्थानके या मार्गावर आहेत.
Mumbai Metro : हजारो नागरिकांना होणार फायदा
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही मेट्रो ही बेलापूर ते तळोजा या मार्गावर धावणार आहे. हा संपूर्ण मार्ग नवी मुंबई शहरातील अंतर्गत भागातून जातो. या मार्गाचा खारघर नोडसह कळंबोली, रोडपाली आणि तळोजा परिसराला मोठा फायदा होणार आहे. तळोजा ही मोठी औद्योगिक वसाहत आहे. शिवाय कळंबोलीचे स्टील मार्केट महामुंबईतील सर्वात मोठे स्टील मार्केट आहे. येथे रोज हजारो चाकरमानी ये-जा करत असतात. या चाकरमान्यांसाठी एनएमएमटीची बससेवा आहे. परंतु, ही बससेवा अतिशय अपुरी आहे. ही मेट्रो सुरू झाली तर या प्रवाशांसह बेलापूर, तळोजा परिसरातील विद्यार्थी आणि स्थानिकांना त्याचा मोठा लाभ होणार आहे.
दरम्यान, नवी मुंबईकरांसह ठाणेकरांना देखील लवकरच मेट्रोचा लाभ मिळणार आहे. नव्या वर्षात मेट्रो 12 सह मेट्रो 5 च्या दुसऱ्या टप्प्याचं काम सुरू होणार आहे. कल्याण ते तळोजा (Kalyan to Taloja) मेट्रो 12 मार्गिकेसह ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो 5 च्या दुसऱ्या टप्प्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. MMRD कडून तयारी सुरू झाली आहे. मेट्रो मार्ग 5 (ठाणे-भिवंडी-कल्याण) या मर्गिकेतील ठाणे ते भिवंडी दरम्यान 12.7 किमी चा पहिला टप्पा प्रगतीपथावर आहे. यामध्ये एकूण 6 स्थानकं आधुनिक सोयी-सुविधांनी सज्ज असणार आहेत. मार्गिकेच्या या टप्प्यातील स्थानकांची 64 टक्के आर्किटेक्चरल कामं पूर्ण झाली आहेत. एकूण 70 टक्के इतकं काम पूर्ण झालं आहे.