मुंबई : मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या सरकारी गाडीला अखेर ई-चलान पाठवण्यात आलं आहे. विलेपार्लेमध्ये 'नो पार्किंग झोन'ला कार पार्क केल्याप्रकरणी मुंबई वाहतूक पोलिसांनी ही कारवाई केली.

मुंबईत सध्या महापालिका आयुक्तांनी पार्किंगचं नवं धोरण जारी केलं आहे. त्यानुसार वाहनतळाच्या 500 मीटरपर्यंतच्या क्षेत्रात अनधिकृत पार्किंग आढळल्यास पाच ते 15 हजार रुपये दंड ठोठावण्याची तरतूद आहे. महापौर 'मालवणी आस्वाद' या हॉटेलबाहेरील 'नो पार्किंग झोन'मध्ये कार पार्क करुन कोलडोंगरी परिसरात गेले.

'मालवणी आस्वाद' या हॉटेलसमोरील गल्ली अरुंद असल्यामुळे त्या भागात वाहतूक कोंडी होते. त्यामुळे हा भाग नव्या पार्किंग धोरणानुसार 'नो पार्किंग' म्हणून जाहीर करण्यात आला.

खुद्द महापौरांचीच गाडी नो पार्किंग झोनमध्ये, महाडेश्वरांना दंड ठोठावणार?

खुद्द महापौरांनीच नो पार्किंगमध्ये गाडी लावल्याचा फोटो सोशल मीडियावर वायरल झाला. त्यानंतर प्रशासन आणि महापौरांवर सर्वसामान्यांकडून टीका केली जात होती.

नो पार्किंग झोनमध्ये गाडी पार्क केली नव्हती, तर उतरण्यासाठी गाडी तिथे थांबवली होती, त्यामुळे नियमांचं उल्लंघन झाल्याचं म्हणता येणार नाही, असं स्पष्टीकरण विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिलं होतं. तसंच पावती आल्यास दंडाची रक्कम भरु, असंही महापौरांनी सांगितलं. अखेर मुंबई वाहतूक पोलिसांनी महापौरांच्या गाडीलाही दंड ठोठावला आहे.

पार्किंगचे सध्याचे दर

महापालिकेच्या वाहनतळांवर सध्या तीन ते चार चाकी वाहनांना एक तास ते 24 तासांसाठी 25 रुपयांपासून 80 रुपयांपर्यंत, दोन चाकी वाहनांना 10 ते 35 रुपये, ट्रक - 35 ते 205 रुपये, रिक्षा-टॅक्सी - 25 ते 80 रुपये आणि बससाठी 25 ते 145 रुपये वाहनतळ शुल्क घेतले जाते. मुंबईतील वाहनतळांच्या शुल्कानुसार वाहनतळ शुल्काचे दर काही प्रमाणात कमी-जास्त आहेत.