मुंबई : 'दलित पँथर'च्या संस्थापकांपैकी एक असलेले आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार आणि ज्येष्ठ विचारवंत राजा ढाले यांचं निधन झालं. मुंबईत विक्रोळी भागातील निवासस्थानी ढाले यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 78 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राजा ढाले यांच्या निधनामुळे आंबेडकरी जनतेवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
राजा ढाले यांची अंत्ययात्रा उद्या (बुधवार 17 जुलै) दुपारी 12 वाजता विक्रोळी पूर्वेतील त्यांच्या निवासस्थानाहून निघणार आहे. दादर चैत्यभूमी येथील इलेक्ट्रिक स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांचं पार्थिव गोदरेज रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती कन्या गाथा ढाले यांनी दिली.
आंबेडकरी चळवळीचा भाष्यकार, मार्गदर्शक, दलित पँथरचा महानायक हरपला आहे, अशी शोकभवना व्यक्त करुन रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांनी राजा ढाले यांना श्रद्धांजली अर्पण केली.
दलित पँथर ही सामाजिक संघटना राजा ढाले यांनी अरुण कृष्णाजी कांबळे आणि नामदेव ढसाळ यांच्या मदतीने स्थापन केली. त्या अगोदर ते भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या (भारिप) राजा ढाले गटाचे प्रमुख होते.
तापसी, येरु, चक्रवर्ती, जातक, विद्रोह अशा अनियतकालिकांत राजा ढाले यांचं लेखन प्रसिद्ध झालं आहे. तसंच त्यांच्या कविता, कथा, प्रस्तावना, प्रसंगोपात लेख, संशोधनात्मक लेखन आणि संपादनं हे सारं साहित्य विखुरलेलं आहे.
राजकीय कारकीर्द
राजा ढाले हे भारिप बहुजन महासंघाच्या तिकिटावर 1999 साली लोकसभा निवडणुकीत उतरले होते. उत्तर-मुंबई मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली, मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. 2004 साली त्यांनी पुन्हा ईशान्य मुंबई मतदारसंघातूनही निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला होता.
'दलित पँथर'चे संस्थापक, ज्येष्ठ विचारवंत राजा ढाले यांचं निधन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Jul 2019 09:48 AM (IST)
दलित पँथर ही सामाजिक संघटना राजा ढाले यांनी अरुण कृष्णाजी कांबळे आणि नामदेव ढसाळ यांच्या मदतीने स्थापन केली. त्या अगोदर ते भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या (भारिप) राजा ढाले गटाचे प्रमुख होते.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -