मुंबई : धरण फुटून उद्ध्वस्त झालेलं रत्नागिरीच्या चिपळूण तालुक्याती तिवरे गाव दत्तक घेण्याचा निर्णय मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर न्यासाने घेतला आहे. सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी ही माहिती दिली. रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांनी तिवरे गाव दत्तक घेण्याची विनंतर सिद्धिविनायक मंदिर न्यासाकडे केली होती.

कोकणात झालेल्या मुसळधार पावसामुळे 2 जुलै रोजी रत्नागिरीतील तिवरे धरण फुटलं. या दुर्घटनेत 23 जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी 20 जणांचे मृतदेह सापडले, मात्र तीन जणांचा शोध लागलाच नाही. धरण फुटल्यामुळे सात गावांमध्ये पाणी घुसलं, परंतु तिवरे गावाचं सर्वाधिक नुकसान झालं.

यानंतर तिवरे गाव दत्तक घेण्याची मागणी रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांनी केली. या मागणीवर विचार करुन सिद्धिविनायक मंदिर न्यासाने गाव दत्त घेण्याचा निर्णय घेतला. मंदिर न्यास गावातील उद्ध्वस्त झालेली घरं, शाळा न नव्याने बांधून देणार आहे. तसंच गृहपयोगी साहित्यही उपलब्ध करुन देणार आहे.


याबाबत सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर म्हणाले की, "तिवरे धरण फुटून अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली, अनेक संसार नाहीसे झाले. अशा परिस्थितीत या गावाचं पुनर्वसन करण्याचा निर्णय मंदिर न्यासाने घेतला आहे. त्या गावासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. खासदार विनायक राऊत आणि आमदार उदय सामंत यांच्या विनंतीचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन, गावाच्या पुनर्वसनासाठी भरीव निधी ठेवण्यात आला आहे. पुढील मान्यतेसाठी हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आला आहे."

दरम्यान, चिपळूणचे शिवसेना आमदार सदानंद चव्हाण हेच तिवरे धरणाचे ठेकेदार असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

संबंधित बातम्या

खेकड्यांनी तिवरे धरण फोडलं, 'पुणे कालवाफुटीच्या थिअरी'ची जलसंधारण मंत्र्यांकडून पुनरावृत्ती

तिवरे धरणफुटी : 20 जणांचे मृतदेह सापडले, अद्याप चौघांचा शोध सुरु