Mumbai Local Train Mega Block: लोकल ट्रेनने प्रवास करताय, जाणून घ्या कोणत्या मार्गांवर आहे मेगाब्लॉक
Mumbai Local Train Mega Block: मुंबई लोकल मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येत आहे. त्यामुळे लोकलच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.
Mumbai Local Train Mega Block: रविवारी सुट्टीनिमित्त बाहेर जाण्याचे नियोजन करत असाल तर त्याआधी मेगाब्लॉकबाबत अधिक माहिती जाणून प्रवासाचे नियोजन करा. रविवारी, 21 ऑगस्ट रोजी उपनगरीय रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक (Mumbai Local Mega Block) आहे. रेल्वे रुळांची देखभाल, ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा दुरुस्ती आदी कामांसाठी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.
मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर शनिवारी मध्यरात्री ते रविवारी पहाटे भायखळा ते माटुंगा दरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला होता. मुख्य मार्गावरील रेल्वे वाहतूक काही मिनिटे उशिराने धावणार आहे.
हार्बर मार्ग:
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वांद्रे/ चुनाभट्टी या मार्गादरम्यान सकाळी 11.40 वाजल्यापासून ते सायंकाळी 4.40 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. तर, चुनाभट्टी/ वांद्रे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.
पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई करीता सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी 10.45 ते सायंकाळी 5.13 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
ब्लॉक कालावधीत पनवेल - कुर्ला ही विशेष लोकल प्लॅटफॉर्म क्रमांक 8 वरून 20 मिनिटाच्या कालावधीत चालवण्यात येतील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी 10.00 ते सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत मुख्य मार्ग आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी असेल.
ट्रान्सहार्बर मार्गावर कोणताही मेगाब्लॉक नाही.
पश्चिम रेल्वे:
पश्चिम रेल्वे मार्गावर बोरिवली ते गोरेगाव या दरम्यानच्या जलद मार्गावर आणि बोरिवली ते कांदिवली धीम्या मार्गावर सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. या ब्लॉकच्या कालावधीत डाउन मार्गावरील जलद लोकल या अंधेरी ते बोरिवली दरम्यान धीम्या मार्गावरून चालवण्यात येतील. तर, डाउन मार्गावरील एक्स्प्रेस, मेल गाड्या अंधेरी ते बोरिवली दरम्यान पाचव्या मार्गिकेवरून चालवण्यात येतील. ब्लॉकमुळे काही लोकल ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत.