मुंबई : पश्चिम रेल्वेवरील ग्रॅन्ट रोडजवळ धावत्या लोकलमध्ये (Mumbai Local) एका तरुणाने 24 वर्षीय तरुणीची छेड काढण्याचा प्रयत्न केला. या तरुणाविरोधात मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मालाड येथे राहणारी तरुणी शुक्रवारी रात्री कामानिमित्त चर्नी रोड येथे लोकलने जात होती.ग्रॅन्ट रोड स्थानक येताच एका तरुणाने तिची छेड काढण्याचा प्रयत्न केला.


अश्लील चाळे, अश्लील वक्तव्य करीत तो तरुणीला त्रास देत होता. संबंधित तरुणीने आरडाओरडा केला असता त्या तरुणाने लोकलचा वेग कमी होताच उडी मारून पळ काढला. याप्रकरणी बुधवारी मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाण्यात तरुणीने तक्रार दाखल केली. या आधारे पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे. 


यानंतर तरुणीने रेल्वे सुरक्षा दलाकडे (आरपीएफ) जाऊन तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरपीएफ, जीआरपी, क्राईम ब्रान्च आणि मुंबई पोलिसांनी पथके तयार करुन आरोपींचा शोध सुरु केला. पोलिसा स्थानकात बसवलेले सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फूटेज तपासत आहे.  


सीएसएमटी-पनवेल लोकलमध्ये तरुणीवर अत्याचार


काही दिवसांपूर्वी हार्बर मार्गावरील मस्जिद बंदर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) या स्थानकादरम्यान भीषण प्रकार घडला. पीडित तरुणी मुंबईतील गिरगाव इथली रहिवासी असून ती नवी मुंबईतील बेलापूर इथे एका परीक्षेला जात होती. पीडित तरुणी सीएसएमटी-पनवेल लोकल ट्रेनच्या सेकंड क्लास डब्यातून प्रवास करत होती. ट्रेन सुरु होताच आरोपी डब्ब्यात चढला. मुलगी एकटीच प्रवास करत होती. याचा फायदा घेत आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. यावेळी तरुणीने स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न केला. तिने आरडाओरडा सुरु केल्यानंतर आरोपीने मस्जिद बंदर स्थानकावर उतरुन पळ काढला. 


महिला सुरक्षेचा प्रश्न उपस्थित


महाराष्ट्राची राजधानी मुंबई सुरक्षित मानली जाते. मुंबईत रात्री एक वाजता देखील महिला लोकल ट्रेनमध्ये एकटी प्रवास करु शकते आणि सुरक्षिततेसाठी महिलांच्या डब्यात पोलीस तैनात असतात. मात्र, या घटनेमुळे लोकल गाड्यांमधील महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसांत  राज्यात महिलांवरील अत्याचारात झालेली  वाढ चिंताजनक आहे 


महिलांच्या डब्याला दिवसाही सुरक्षा द्या 


लोकलमध्ये महिलांमध्ये होणारे अत्याचार ही काही पहिली घटना नाही त्यामुळेच या घटनांना आळा घालण्यासाठी महिलांच्या डब्याला रात्री 9  ते सकाळी 6 अशी पोलिसांची गस्त असते. पण आता जर भर दिवसा अशा घटना घडत असतील तर मग दिवसाही पोलिसांची सुरक्षा महिला डब्ब्याला द्या अशीच मागणी प्रत्येक महिला प्रवाशाकडून होते.


हे ही वाचा :


 परीक्षेला जाणाऱ्या 20 वर्षीय तरुणीवर धावत्या ट्रेनमध्ये लैंगिक अत्याचार, आरोपी अटकेत