Mumbai Crime : मुंबईकरांची (Mumbai) लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेनमध्ये (Local Train) 20 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार (Sexual Assault) केल्याची धक्कादायक घटना घडली. धावत्या लोकल ट्रेनच्या महिला डब्ब्यात आरोपीने मुलीवर अत्याचार केला. ही घटना काल (14 जून) सकाळी घडली. पीडित तरुणी परीक्षेला जात असताना तिच्यावर हा प्रसंग ओढावला. आरोपीला घटनेनंतर आठ तासात अटक करण्यात आल्याची माहिती जीआरपी अधिकाऱ्यांनी दिली. नवाज करीम (वय 40 वर्षे) आरोपीचं नाव आहे.


सीएसएमटी-पनवेल लोकलमध्ये तरुणीवर अत्याचार


हार्बर मार्गावरील मस्जिद बंदर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) या स्थानकादरम्यान काल सकाळी 7.28 वाजता हा भीषण प्रकार घडला. पीडित तरुणी मुंबईतील गिरगाव इथली रहिवासी असून ती नवी मुंबईतील बेलापूर इथे एका परीक्षेला जात होती. पीडित तरुणी सीएसएमटी-पनवेल लोकल ट्रेनच्या सेकंड क्लास डब्यातून प्रवास करत होती. ट्रेन सुरु होताच आरोपी डब्ब्यात चढला. मुलगी एकटीच प्रवास करत होती. याचा फायदा घेत आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. यावेळी तरुणीने स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न केला. तिने आरडाओरडा सुरु केल्यानंतर आरोपीने मस्जिद बंदर स्थानकावर उतरुन पळ काढला.


सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फूटेज तपासून आरोपीची ओळख पटवली


यानंतर तरुणीने रेल्वे सुरक्षा दलाकडे (आरपीएफ) जाऊन तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरपीएफ, जीआरपी, क्राईम ब्रान्च आणि मुंबई पोलिसांनी पथके तयार करुन आरोपींचा शोध सुरु केला. पोलिसांनी मस्जिद बंदर स्थानकात बसवलेले सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फूटेज तपासून त्या व्यक्तीची ओळख पटवली.


घटनेनंतर आठ तासात आरोपीला बेड्या


घटनेच्या आठ तासांनंतर दुपारी चारच्या सुमारास आरोपीला अटक करण्यात आली. नवाज करीम असं आरोपीचं नाव असून तो रोजंदारी करणारा आहे. त्याच्यावर बलात्काराच्या आरोपासह भारतीय दंड संहितेच्या (IPC) संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांकडून आरोपीची कसून चौकशी केली जात आहे. त्याला गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.  


महिला सुरक्षेचा प्रश्न उपस्थित


महाराष्ट्राची राजधानी मुंबई सुरक्षित मानली जाते. मुंबईत रात्री एक वाजता देखील महिला लोकल ट्रेनमध्ये एकटी प्रवास करु शकते आणि सुरक्षिततेसाठी महिलांच्या डब्यात पोलीस तैनात असतात. मात्र, या घटनेमुळे लोकल गाड्यांमधील महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.


हेही वाचा


Mumbai Crime : मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात 23 वर्षीय कैद्यासोबत अनैसर्गिक लैंगिक संबंध, दोन कैद्यांविरुद्ध गुन्हा दाखल