Mumbai Kandivali Firing : मुंबई पश्चिम उपनगरातील कांदिवली (Kandivali) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लालजी पाडा परिसरात गोळीबाराची (Firing) घटना घडली. आज (28 मे) सकाळी 7 वाजून 57 मिनिटांनी ही गोळीबाराची घटना घडली. या घटनेत एका 32 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. गोळीबार नेमका कशावरुन झाला हे मात्र अद्याप समजलेलं नाही. गोळीबार करुन आरोपी पसार झाला आहे.
दरम्यान गोळीबाराच्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर कांदिवली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करुन पोलिसांनी तरुणाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला आहे. गोळीबाराच्या घटनेमुळे कांदिवली लालजी पाडा परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. विशेष म्हणजे कांदिवली लालजी पाडा परिसरात मागील सहा ते सात महिन्यांतील गोळीबाराची ही दुसरी घटना आहे. याआधी 1 ऑक्टोबर 2022 रोजी गोळीबाराची घटना घडली होती.
दरम्यान मृत तरुण या परिसरात टँकरने पाणी विक्रीचा व्यवसाय करत होता. याच व्यवसायाच्या वर्चस्व वादातून त्याची हत्या झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. कांदिवली पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे.
मागील वर्षी याच परिसरात गोळीबाराची घटना
मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात कांदिवली पश्चिमेतील लालजी पाडा परिसरात गोळीबाराची घटना घडली होती. परिसरात मध्यरात्री अचानक गोळीबार करण्यात आला. तब्बल चार राऊंड फायरिंग झाली होती. या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला होता तर अन्य तिघे जखमी झाले होते. मध्यरात्री सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली होती. बाईकवरुन आलेल्या दोघांनी अचानक गोळीबार करण्यास सुरुवात केली. परस्परांमध्ये असलेल्या वादातून गोळीबार करण्यात आला होता. या घटनेची माहिती मिळताच कांदिवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला. यानंतर पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या दोन जणांना गुजरातमधून अटक केली होती.
अंधेरीत गोळीबार करत हॉटेल मालकाचं अपहरण
महिनाभरापूर्वी अंधेरी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत धक्कादायक घटना घडली होती. मुंबईच्या अंधेरी कुर्ला रोडवरील हॉटेल विरा रेसिडेन्सीचे मालक यांच्यावर गोळीबार झाला होता. अगदी फिल्मी स्टाईलने हा गोळीबार केल्यानंतर गोळीबार करणाऱ्यांनी जखमी झालेल्या हॉटेल मालकाचे इनोव्हा गाडीतून अपहरण केलं होतं. सध्या एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन 10 ते 12 वेगवेगळ्या टीम बनवून आरोपीचा शोध सुरु केला. त्यानंतर पोलिसांनी अवघ्या 24 तासात आरोपींना अटक करुन हॉटेल मालकाची सुखरुप सुटका केली होती.
हेही वाचा