मुंबई : अंधेरी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक धक्कादायक घटना पुढे आली आहे. मुंबईच्या अंधेरी कुर्ला रोडवरील हॉटेल विरा रेसिडेन्सीचे मालक यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. अगदी फिल्मी स्टाईलने हा गोळीबार केल्यानंतर गोळीबार करणाऱ्यांनी जखमी झालेल्या हॉटेल मालकाचे इनोव्हा गाडीतून अपहरण केलं आहे. सध्या एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करून 10 ते 12 वेगवेगळ्या टीम बनवून आरोपीचा शोध सुरू केले आहेत.


दिवसाढवळ्या मुंबईसारख्या शहरात घडलेल्या घटनेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचं स्पष्ट आहे. मुंबईत नेमकं काय चाललंय हा प्रश्न या निमित्ताने उभा राहिला आहे. वारंवार अशा घटना घडत असल्यामुळे कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघत आहेत. पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिला आहे की नाही असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. 


चोरीच्या उद्देशाने घरात प्रवेश करणारा चोरटा सीसीटीव्हीत कैद


मुंबईत मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशाच एका चोरीच्या प्रयत्नात असलेला चोरटा सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. कांदिवली पश्चिमेकडील लालजीपाडा परिसरात इमारतीत हा चोरटा चोरी करण्याच्या उद्देशाने घरात प्रवेश करत असल्याचे सीसीटीव्ही मध्ये स्पष्ट दिसत आहे. सीसीटीव्ही व्हिडिओ 22 एप्रिलच्या रात्रीचा असल्याचे दिसून येत आहे.


या सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये एक चोर पायऱ्यांवरून चालत असताना दिसून येत आहे त्याची हालचाल या सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. तो पुन्हा शिड्यांवरून खाली उतरतानाही दिसत असून चोरीचा प्रयत्न करत असल्याचेही व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. मात्र हा प्रयत्न करत असताना त्या घरातील कुटुंबाला जाग आल्यामुळे चोर त्या ठिकाणावरून पळून जात असल्याचे देखील या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. या चोराला पकडण्यासाठी एक व्यक्ती त्याचा पाठलाग करतानाही दिसून येत आहे मात्र चोर त्याच्या हाती लागला नाही. सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर कांदिवली पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत.


गोळीबाराने पुणे हादरलं...


पुण्यात किरकोळ वादावरुन होणाऱ्या हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. त्यात अनेकजण सर्रास हवेत गोळीबार करत असल्याच्या घटना समोर येत आहेत. सकाळीच शेकोटी पेटवण्यावरून झालेल्या किरकोळ वादामधून हवेमध्ये गोळीबार (Firing) करण्यात आल्याची घटना घडली होती. पुण्यातील वडगावशेरीजवळील ब्रह्मा सनसिटी या ठिकाणी असलेल्या अर्नोल्ड स्कूल समोर रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली होती. गोळीबारानंतर परिसरात खळबळ उडली होती. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. अमित सिंग यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. अमित सिंग यांचा आईस्क्रीमचा ब्रॅंड आहे. त्यांची हडपसरला फॅक्टरी असून त्यांच्या आठ ते नऊ फ्रॅन्चायजी दिलेल्या आहेत. ते कल्याणी नगरमधील सिलीकॉन बे येथे राहतात.  तेथील रस्त्याच्या डेड एन्डला एका ठिकाणी काही तरुण शेकोटी करुन शेकत बसले होते. त्यावेळी ही घटना घडली.