मुंबई : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (Mumbai Airport) अर्थातच टर्मिनल 2 उडवण्याची धमकी देणारा मेल आल्याची माहिती समोर आली. याप्रकरणात धमकी देणाऱ्या युवकाला एटीएसने त्रिवेंद्रममधून ताब्यात घेतल्याची माहिती देण्यात आलीये. या संदर्भात अधिक तपास सध्या सुरु आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देणारा मेल आला होता. यासंदर्भात पोलिसांत गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय.
स्फोट टाळण्यासाठी 48 तासांत 10 लाख डॉलरची मागणी या मेलद्वारे करण्यात आली होती. बिटकॉइनमध्ये या युवकाने पैशांची मागणी केली होती. मुंबईच्या सहार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भादंवि कलम 385 आणि 505 (1) (बी) अन्वये गुन्हा दाखल केला होता.
नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (CSMIA) टर्मिनल 2 वर गुरुवारी बॉम्बनं उडवण्याची धमकी देणारा ईमेल आला आणि एअरपोर्ट प्रशासनाची झोप उडाली. सूत्रांनी सांगितलं की, हा धमकीचा ईमेल पाठवणाऱ्या व्यक्तीनं हा स्फोट टाळण्यासाठी 48 तासांच्या आत एक दशलक्ष डॉलर्स भरण्याची मागणी केली आहे, तेही बिटकॉइनमध्ये. एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, सहारा पोलिसांनी या प्रकरणी एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीनं quaidacasrol@gmail.com हा ईमेल आयडी वापरुन धमकीचा ईमेल पाठवला आहे.
धमकीचा ईमेल आल्यानंतर तात्काळ मुंबई पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. मुंबई पोलिसांनी तात्काळ सूत्र हलवण्यास सुरुवात केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीनं गुरुवारी सकाळी 11 वाजून 6 मिनिटांनी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (MIAL) च्या फीडबॅक इनबॉक्समध्ये हा ईमेल पाठवला होता.
आरोपीनं धमकीच्या ईमेलमध्ये लिहिलं होतं की, "तुमच्या विमानतळासाठी हा अंतिम इशारा आहे. असं न झाल्यास, आम्ही विमानतळाच्या टर्मिनल 2 वर 48 तासांच्या आत बॉम्बस्फोट करू, अन्यथा आम्हाला बिटकॉइनमध्ये एक दशलक्ष डॉलर्स पाठवले जातील आणि 24 तासांनंतर दुसरा इशारा दिला जाईल.